महाराष्ट्रात चालकांसाठी मराठी भाषेची अट अनिवार्य करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर Rapidoने आपल्या बाइक, ऑटो आणि कॅब चालकांसाठी विशेष मराठी भाषा शिकण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
चालकांना मराठी सहज शिकता यावी आणि प्रवाशांशी संवाद साधताना भाषेची अडचण येऊ नये, यासाठी कंपनीने स्वतंत्र डिजिटल लर्निंग रिसोर्सेस उपलब्ध करून दिले आहेत. असा उपक्रम राबवणारे Rapido हे पहिले मोबिलिटी प्लॅटफॉर्म असल्याचा कंपनीचा दावा आहे.
महाराष्ट्रात विविध भागांत सेवा देणाऱ्या चालकांना मराठी शिकणे आणि प्रवाशांशी प्रभावीपणे संवाद साधणे सोपे जावे, या उद्देशाने कंपनीने डिजिटल माध्यमातून मराठी भाषा शिकण्याची सामग्री उपलब्ध करून दिली आहे.
Rapidoने चालकांच्या गरजेनुसार तीन स्वतंत्र YouTube चॅनेल सुरू केले आहेत. या चॅनेलवर बाइक, ऑटो आणि कॅब चालकांसाठी स्वतंत्र मराठी शिकण्याची सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कॅब कॅप्टन्ससाठी – Rapido Cab Dost Mumbai
बाइक कॅप्टन्ससाठी – Bike Dost Mumbai
ऑटो कॅप्टन्ससाठी – Rapido Mumbai
या माध्यमातून चालकांना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार मराठी शिकता येणार आहे. महाराष्ट्रात प्रवाशांशी दैनंदिन संवाद साधताना आवश्यक ठरणाऱ्या मराठी भाषेचे ज्ञान मिळवण्यासाठी ही सामग्री तयार करण्यात आली आहे.
केवळ YouTubeपुरता हा उपक्रम मर्यादित नसून Rapido अॅपमधील सूचना (in-app nudges), WhatsApp चॅनेल आणि Rapido Dost पेजेसच्या माध्यमातूनही चालकांपर्यंत ही माहिती पोहोचवली जाणार आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, चालकांना केवळ मराठी शिकण्याची आवश्यकता सांगण्याऐवजी भाषा शिकण्यासाठी प्रत्यक्ष आणि सहज उपलब्ध साधने देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.
Rapidoचे Vice President Operations रोहित राठोड यांनी सांगितले की, महाराष्ट्रात चालकांसाठी मराठी भाषेच्या ज्ञानावर अधिक भर दिला जात असताना कंपनी आपल्या कॅप्टन्सना ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी मदत करू इच्छिते. बाइक, ऑटो आणि कॅब कॅप्टन्ससाठी स्वतंत्र मराठी शिकण्याचे चॅनेल सुरू करणारे Rapido हे पहिले मोबिलिटी प्लॅटफॉर्म असल्याचे त्यांनी म्हटले.
महाराष्ट्रात मोठ्या संख्येने बाहेरील राज्यांमधून आलेले चालक कॅब, ऑटो आणि बाइक टॅक्सी सेवा देतात. त्यामुळे चालकांना मराठी शिकण्यासाठी डिजिटल प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम प्रवासी आणि चालक यांच्यातील संवाद अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो.
हेही वाचा