मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी 'चाकावरचे उपाहारगृह'

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासन नेहमीच विविध सोयी-सुविधा उपलब्ध करत असते. अशातच आता प्रवाशांना प्रवासावेळी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा यासाठी मध्य रेल्वे 'चाकावरचे उपाहारगृह' सेवेत आणत आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकात असणार आहे. सीएसएमटी स्थानकातील १८ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मबाहेर 'रेस्टॉरन्ट ऑन व्हील' ही नवी संकल्पना साकारण्यात येणार आहे.

प्रवासी, पर्यटक यांना आता रेल्वेच्या डब्यात निवांतपणे बसून खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येणार आहे. यासाठी वापरात नसलेल्या एक्स्प्रेसच्या प्रवासी डब्याचे रूपांतर उपाहारगृहात करण्यात येत आहे. सध्या याची तयारी अंतिम टप्प्यात असून ऑक्टोबरअखेरीस ते सेवेत येणार असल्याची माहिती मिळते.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात खाद्यपदार्थाचे ठेले (स्टॉल) आहेत. मात्र, याठिकाणी आरामात बसून खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येईल, असे उपाहारगृह नाही. यामुळे प्रवासी, पर्यटकांना रेल्वे स्थानकाबाहेरील हॉटेलवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळं भारतीय रेल्वेनं 'चाकावरचे उपाहारगृह' (रेस्टॉरन्ट ऑन व्हील) ही संकल्पना अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वेच्या एका जुन्या व वापरात नसलेल्या एक्स्प्रेस डब्याचे रूपांतर या उपाहारगृहात करण्यात येत आहे. यात रेल्वेच्या डब्यातच बसून खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येणार आहे. यासाठी सीएसएमटी स्थानकावरील फलाट क्रमांक १८ च्या बाहेरील आवारातच (पी.डी’मेलो रस्ता) उपाहारगृह उभे करण्यात येत आहे.

जानेवारीमध्ये रेल्वेच्या डब्यात अशा प्रकारची सुविधा देण्यासाठी निविदा काढण्यात आली आणि हे काम एका कंपनीला दिल्यानंतर आता उपाहारगृह उभारणीसाठी डब्यातील अंतर्गत रचनेत बदल, रंगरंगोटीसह अनेक कामे केली जात आहेत. या कामांना गती दिली जात असून ऑक्टोबर अखेरीस ते सेवेत येणार आहे. हा डबा वातानुकूलित असून, यामध्ये ४० जणांना बसण्याची व्यवस्था असणार आहे. यासाठी कंत्राटदाराला २८ ते ३० लाख रुपये खर्च येणार आहे.

सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १८ च्या बाहेरच खासगी वाहनाने अनेक जण पोहोचतात व मेल-एक्स्प्रेस गाड्या पकडण्यासाठी आत प्रवेश करतात. तसंच प्लॅटफॉर्म क्रमांक १८ मधून बाहेर पडूनही टॅक्सी किंवा खासगी वाहनाने जाणारे बरेच प्रवासी असतात. इथंच वाहनतळाचीही सुविधा आहे. त्यामुळं उपाहारगृह उभे राहिल्यास त्याचा बराच फायदा होऊ शकतो. मध्य प्रदेश रेल्वे टुरिझम कॉपरेरेशनेही रेल कोच रेस्टॉरन्ट सुविधा सुरू केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या