'इ-चलान' दंड भरा; अन्यथा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द!

मुंबईतील ट्राफिक पोलिसांनी रस्त्यावर बेदरकारपणे गाड्या चालवणाऱ्या नागरिकांची एक यादी तयार केली आहे. या यादीनंतर आता मुंबईतील ट्राफिक पोलिस या 'रॅश' ड्रॉयव्हर्सकडून त्यांच्या 'इ-चलान'वर साठलेला दंड वसूल करणार आहेत. मुंबईतील मारुती अर्टिगा आणि ह्युंदाई व्हर्ना या २ गाड्यांच्या मालकांच्या नावावर सर्वाधिक 'इ-चलान' आहेत. तब्बल १५० 'इ-चलान' आणि एक लाख ५२ हजारांचा दंड तर ११० चलान आणि एक लाख १० हजार रुपयांचा दंड या गाड्यांच्या मालकांच्या नावावर साठला आहे. 

मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर बेदरकारपणे गाडी चालवणारे पोलिसांच्या रडारवर आहेत. या वाहन चालकांच्या नावावर ७० ते १५० 'इ-चलान' कापले गेले आहेत. तिसऱ्या स्थानावर मालाडच्या एका होंडा सिटी गाडीचा मालक आहे. या व्यक्तीच्या नावे तब्बल ८० हजार रुपयांचे चलान थकीत आहे. चौथ्या आणि पाचव्या जागेवर कांदिवलीमधील रेनो डस्टर आणि होंडा जॅझ या गाड्यांचे मालक आहेत. यांच्या नावावर अनुक्रमे ७२ हजार आणि ७१ हजारांचा दंड थकीत आहे.

पोलिसांसाठी सदर दंड वसूल करणे हे काम अत्यंत जिकीरीचं असणार आहे. काही केसेसमध्ये RTO चा दंड हा जवळजवळ त्यांच्या वाहनाच्या किमती एवढा झाला आहे. अनेकदा गाड्या एका वाहन मालकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला विकल्या जातात. मात्र वाहन मालक स्वतःच्या नावावर गाडी करून घेत नाहीत. त्यामुळं गाडीच्या जुन्या मालकांकडून दंड वसूल करण्यास जावं लागणार असल्याचं RTO सूत्रांनी सांगितलं आहे. RTO कडे एकूण ३१७ कोटी रुपयांचा 'इ-चलान'वरील दंड येणं बाकी आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या