महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (Maharashtra State Road Transport Corporation) शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये शालेय सहलींसाठी मोठी कामगिरी केली आहे.
तब्बल 25,558 बस ट्रिप्सद्वारे लाखो विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवासाची सुविधा देत महामंडळाने 127 कोटी 18 लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. हे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत 33 कोटी 29 लाखांनी अधिक आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी सांगितले की, शालेय सहल ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक संस्मरणीय अनुभव असतो.
राज्यातील शाळा आणि महाविद्यालये धार्मिक तसेच ऐतिहासिक स्थळांना सहली आयोजित करतात. या सहली ST मार्फत घेतल्यास विद्यार्थ्यांना भाड्यात 50 टक्के सवलत दिली जाते, त्यामुळे या सहली सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणाऱ्या ठरतात.
या वर्षभरात राज्यभरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या मागणीनुसार ST महामंडळाने मोठ्या प्रमाणावर बस सेवा पुरवली. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या सुविधेचा मोठा फायदा झाला असून, त्यांनी सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव घेतला.
यावर्षी सहलींसाठी नवीन आणि अद्ययावत बसांचा वापर करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि समाधानकारक झाला, असेही सरनाईक यांनी नमूद केले.
आगामी काळातही शालेय सहलींसाठी ST बस उपलब्ध करून दिल्या जाणार असून, शाळा आणि महाविद्यालयांनी खासगी बसांऐवजी ST सेवेला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.