येत्या २० एप्रिलपासून टोल वसूली सुरु होणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवलं आहे. परंतु, या लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारकडून नियमावली जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार, अनेक सुविधा येत्या २० एप्रिल पासून सुरु होणार आहेत. त्याचप्रमाणे आता टोल वसुली देखील २० एप्रिलपासूनच सुरू करणार असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) रस्त्यांवर टोल वसुली सुरू केली जाणार असल्याचं पत्र सरकारने जारी केलं आहे. 

रस्ते परिवहन मंत्रालयाने एनएचएआयला पत्र लिहिलं आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व ट्रका आण मालवाहू वाहनांच्या आंतरराज्यीय हालचालीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे एनएचएआयने गृह मंत्रालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावी आणि टोल वसुली २० एप्रिल २०२० पासून सुरू करावी, असं या पत्रात म्हटलं आहे.

वाहतूक उद्योगीशी संबंधित वर्गाने या निर्णयाचा विरोध केला आहे. राष्ट्रीय लॉकडाऊननंतर २५ मार्चपासून टोल वसुली अनिश्चित काळासाठी बंद केली होती, जेणेकरुन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा. पण ही वसुली आता पुन्हा सुरू होणार आहे.

केंद्रीय परिवहन मंत्रालयाने एनएचएआयच्या एका पत्राचं उत्तर दिलं आहे. एनएचएआयने ११ ते १४ एप्रिल या काळात पत्रव्यवहार केला होता. गृह मंत्रालयाने खाजगी आणि संस्थांच्या अनेक कार्यांसाठी २० एप्रिलपासून परवानगी दिली आहे. टोल वसुली सुरू केल्यामुळे सरकारला यातून महसूल मिळेल आणि एनएचएआयलाही आर्थिक लाभ होईल, असं कारण टोल सुरू करण्यामागे देण्यात आलं आहे.

२० एप्रिलपासून हे होणार सुरु

  • जीवनावश्यक, अनावश्यक वस्तूंच्या मालवाहू ट्रका, हायवे ढाबा, ट्रकांची गॅरेज

  • शेतीसंबंधी कामे, खत, कीटकनाशक दुकाने, शेती साहित्य यांचा पुरवठा

  • मत्स्य व्यवसाय

  • ग्रामीण भागातील उद्योग, रस्ते काम, सिंचन प्रकल्प

  • ग्रामीण भागातील बांधकामे, मनरेगा कामे

  • SEZ मधील निर्मिती कंपन्या, जीवनावश्यक वस्तूंची पॅकेजिंग

  • कोल्ड स्टोरेज सेवा

  • वित्तीय सेवा

  • आयटी सेवा, डिजीटल व्यवहार, कॉल सेंटर्स, सरकारी कार्यालये, ऑनलाईन शिक्षण

  • कुरियर सेवा

  • सर्व आरोग्य सेवा

  • लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांच्या सोयीसाठी लॉजिंग, हॉटेल

  • इलेक्ट्रिशियन, रिपेअर्स, प्लंबर अशा सेवा

हे राहणार बंद

  • सिनेमागृहे, मॉल्स, आदरातिथ्य सेवा

  • सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम

  • रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतूक

  • शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था
पुढील बातमी
इतर बातम्या