आता तृतीयपंथींना मिळणार रेल्वेत हक्काचं स्थान

समाजातला दुर्लक्षित राहिलेला घटक असलेल्या तृतीयपंथी वर्गासाठी भारतीय रेल्वे आता सरसावली आहे. रेल्वे बोर्डाने तृतीयपंथींयांना हक्काचे स्थान देण्यासाठी आरक्षण प्रक्रियेत बदल करण्यासाठी परिपत्रक काढले आहे.

पश्चिम रेल्वेला हे पत्र मिळाले असून आरक्षण करण्याच्या आणि रद्द करण्याच्या अर्जात ‘मेल’, ‘फीमेल’ यांच्यासह ‘ट्रॉन्सजेंडर’ म्हणून ‘टी’ या इंग्रजी अद्याक्षराचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने तृतीयपंथीयांच्या हक्काबाबत रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाचा रेल्वेमंत्रालयाने आढावा घेत तो अमंलबजावणीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवला. त्यानुसार तिकीट आरक्षण करताना स्त्री-पुरुष या प्रवर्गासह तृतीयपंथी प्रवर्गाचा समावेश करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सीआरआयएस सॉफ्टवेअरमध्येही ‘टी’ अक्षराचा समावेश

सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीमने (सीआरआयएस) देखील सॉफ्टवेअरमध्ये टी या अद्याक्षराचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीमला (पीआरएस) देखील ऑनलाईन आरक्षण प्रक्रियेत ‘टी’ या अद्याक्षराचा समावेश करण्यास सांगितले आहे, असे या परिपत्रकात म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिला होता निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने 2014 साली याबाबत निर्णय देत लिंग प्रकारात स्त्री-पुरुष-तृतीयपंथी या प्रवर्गाचा समावेश करावा, असा निकाल दिला आहे. देशात तब्बल 4 लाख 90 हजारांपेक्षा जास्त तृतीयपंथी असून या वर्गात साक्षरतेचे प्रमाण 56.07 टक्के आहे. राज्यात 40 हजार 891 तृतीयपंथी असून साक्षरतेचे प्रमाण 67.57टक्के आहे. त्यामुळे रेल्वेच्या या निर्णयामुळे सुमारे पाच लाख तृतीयपंथींना फायदा होणार आहे.


हेही वाचा

धक्कादायक...मुंबई-अहमदाबाद रेल्वेलाच प्रवासी नाहीत! बुलेट ट्रेनचं काय होणार?

पुढील बातमी
इतर बातम्या