ठाणे स्टेशनवर लवकरच प्रीपेड रिक्षा सेवा सुरू होणार

ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी सुविधा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. रिक्षाचालकांसोबत भाड्यावरून होणारी घासाघीस आणि वाद टाळण्यासाठी ठाणे RTOकडून स्टेशनवर प्रीपेड ऑटो स्टँड सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

ठाणे आमदार संजय केळकर, ठाणे वाहतूक पोलीस आणि RTO यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, आजच या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.

या प्रीपेड व्यवस्थेत प्रवाशाला आधी आपलं गंतव्यस्थान सांगावं लागेल आणि निश्चित भाडं भरावं लागेल. त्यानंतर प्रवाशाला रिक्षा उपलब्ध करून दिली जाईल.

ठाणे RTOच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगीनी पाटील यांच्या माहितीनुसार, रेल्वे स्थानकापासून साधारण 6 ते 8 किलोमीटरच्या परिसरातील प्रमुख ठिकाणांसाठी भाडे निश्चित करण्यात आलं आहे.

RTOने परिवहन आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला असून मंजुरीची प्रतीक्षा आहे. स्थानिक पोलीस आणि मध्य रेल्वेसोबतचा समन्वयही अंतिम टप्प्यात आहे. आवश्यक नियोजन आणि पायाभूत सुविधा तयार असून मंजुरी मिळताच सेवा सुरू करता येईल, असं RTOकडून सांगण्यात आलं आहे.

घासाघीस, मनमानी भाडं आणि रिक्षा नाकारण्याला आळा

प्रीपेड रिक्षा सेवेमुळे प्रवाशांना भाड्यासाठी घासाघीस करावी लागणार नाही. मनमानी भाडे आकारणे, प्रवाशांना इच्छित ठिकाणी जाण्यास नकार देणे आणि भाड्यावरून होणारे वाद यावरही नियंत्रण येण्याची अपेक्षा आहे.

आमदार संजय केळकर यांनी सांगितलं की, प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये दररोज होणारे भाडे आणि रिक्षा नाकारण्याचे वाद लवकरच संपण्याची शक्यता आहे. प्रवाशांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

गर्दीच्या वेळेत RTOचे अधिकारी तैनात

याशिवाय, ठाणे रेल्वे स्थानकावर सकाळच्या आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत RTOचे दोन अधिकारी तैनात केले जाणार आहेत.

हे अधिकारी चार तासांच्या शिफ्टमध्ये काम करतील. रिक्षाचालकांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासोबतच प्रवाशांकडून आलेल्या गैरवर्तनाच्या तक्रारींवरही ते तातडीने कारवाई करतील.

या व्यवस्थेमुळे रिक्षाचालकांमध्ये शिस्त आणण्यासोबतच ठाणे स्टेशन परिसरातील वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा

मुंबई महापालिका शाळांमध्ये ‘सोशल ऑडिट’वरून वाद

पुढील बातमी
इतर बातम्या