अाता पश्चिम रेल्वेवरील लोकलही होणार गारेगार

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • परिवहन

पश्चिम रेल्वे मार्गावर विरार ते चर्चगेट स्थानकांदरम्यान धावणाऱ्या वातानुकूलित म्हणजेच एसी लोकलमुळे सामान्य लोकलच्या तब्बल १२ फेऱ्या रद्द करण्यात अाल्या अाहेत. पण यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत असल्याच्या कारणास्तव अनेकदा पश्चिम रेल्वेला प्रवाशांच्या टीकेचं धनी व्हावं लागलं अाहे. त्या पार्श्वभूमीवर अाता सामान्य लोकलमधील तीन किंवा सहा डबे वातानुकूलित करण्याबाबतचा अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे.

अहवाल प्रायोगिक तत्वावर रेल्वे बोर्डाकडे

सामान्य बारा डबा लोकलचे सहा डबे वातानुकूलित करण्यापेक्षा प्रायोगिक तत्वावर तीन डबेच वातानुकूलित करण्याचा विचार सुरू आहे. पण याबाबत अंतिम निर्णय रेल्वे बोर्डाकडून घेण्यात येणार आहे.

एसी लोकलचं तिकीट अावाक्याबाहेरचं

पश्चिम रेल्वे मार्गावर चालवण्यात येणाऱ्या एका एसी लोकलमुळे सामान्य लोकलच्या दिवसभरातील १२ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. या रद्द फेऱ्यांमुळे अन्य लोकल फेऱ्यांचा भार वाढला. त्यामुळे किमान फर्स्ट क्लासच्या प्रवाशांना वातानुकूलित लोकल गाडीतून प्रवास करण्याची मागणी करण्यात आली. तसंच, एसी लोकलचं तिकिट सामान्य प्रवाशांच्या अावाक्याबाहेरचं आहे. त्यामुळे हा प्रवास सामान्य प्रवाशांना परवडणारा नाही.

तीन किंवा सहा डबे गारेगार होणार

सध्या मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर बारा डब्यांच्या लोकल गाड्या धावत असून यातील सहा किंवा तीन डबे वातानुकूलित करता येतील का, याची चाचपणी सुरू अाहे. त्यासाठी रेल्वे बोर्डाकडून एक समितीही नियुक्त करण्यात आली अाहे. या समितीकडून अभ्यास करून सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. पण जर हा प्रस्ताव प्रत्यक्षात साकार झाला, तर सामान्य प्रवाशांनाही गारेगार लोकलमधून प्रवास करणं शक्य होणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या