इस्टर्न एक्स्प्रेस वेवर ट्रॅफिक जाम, उड्डाणपुलाचा नटबोल्ट निखळला

मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावर अमर महल जंक्शन (चेंबूर) येथील उड्डाणपुलाच्या अँगलचे नटबोल्ट तुटल्यामुळे या उड्डाणपुलाचा मुंबईकडून ठाणे, नवी मुंबईकडे जाणारा संपूर्ण मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावर अमर महल जंक्शन (चेंबूर) येथील उड्डाणपुलाच्या मुंबईकडून ठाण्याकडे जाणाऱ्या भागावर अँगलचे नटबोल्ट तुटल्याची बाब शुक्रवारी सायंकाळी निदर्शनास आली होती. या फटी मोठ्या असल्यामुळे त्यावरून वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक ठरणार असल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या दुरूस्ती कामासाठी या उड्डाणपुलाचा मुंबईकडून ठाण्याकडे जाणारा संपूर्ण मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सायन आणि भक्तीपार्कपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पहायला मिळालं . चेंबूर नाका ते अमर महल या मार्गावर ट्रॅफिक जाम होत असून वाहतूक पोलीसही यापुढे हतबल झालेले दिसत आहेत.

पूर्व द्रुतगती मार्गावरून मुंबईकडून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन महापालिकेच्या बहुमजली इमारत बांधकाम विभागाने परिपत्रकाद्वारे केले आहे.

पर्यायी मार्ग
1) वडाळा फ्री वे मार्गे छेडानगर
2) कुर्ला डेअरी सांताक्रूझ चेंबूर लिंक मार्गे छेडानगर
3) सुमननगर - चेंबूर नाका मानखुर्द मार्गे छेडानगर
4) सुमननगर - चेंबूर नाका गोवंडी मार्गे छेडानगर
5) सायन धारावी एल. बी. एस. मार्गे घाटकोपर - अंधेरी लिंक रोड

पुढील बातमी
इतर बातम्या