मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूककोंडी

मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडी झाल्याची माहिती समोर येत आहे. मागील १ तासापासून गोरेगावहून बोरिवलीच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर वाहतुककोंडी निर्माण झाली आहे. गाड्या हळुहळु पुढे सरकत आहेत. 

रेल्वे गाड्या बंद असल्यानं सर्वसामान्यांना वाहनांचाच आधार घ्यावा लागतोय. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी असल्याचं पाहायला मिळत आहे. रेल्वेसेवा अजूनही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांपुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे अतिरिक्त गर्दीचा भार रस्ते वाहतुकीवर पडतोय.  कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, कसारा, पनवेल, विरार येथून प्रवासी मुंबईच्या वेशीवर एसटीने येतात आणि पुढे बेस्टने कार्यालय गाठतात. यात अनेकांचे दिवसाचे ४ ते ६ तास प्रवासात जात आहेत.

मुंबई अनलॉक होते आहे, परंतु मुंबईची लोकल सामान्यांसाठी अद्याप खुली नाही. परिणामी मुंबईच्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. खाजगी कार्यालयांतील उपस्थितीचं प्रमाण वाढवल्यानं आणि आता बसेसही अपुऱ्या पडत असल्यानं लोक मिळेल त्या वाहनानं कार्यालय गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या