नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना तिळगूळ वाटप

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • परिवहन

माटुंगा - सायन जंक्शनजवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना धडा शिकविण्यासाठी एक अनोखे जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी वाहनचालकांना तिळगूळ वाटप करून चांगली चपराक देण्यात आली. रस्ते सुरक्षा सप्ताह निमित्त माटुंगा वाहतूक विभागाच्यावतीने हा अनोख मकर संक्रांत सण साजरा करण्यात आला. या अभियानात माटुंग्यातील रुईया महाविद्यालयाच्या 25 विद्यार्थ्यांसह माटुंगा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भूषण राणे, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद सूळ आणि पथकाने भाग घेतला होता.

या अनोख्या अभियानात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना चक्क तिळाचे लाडू देऊन टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार करण्यात आला. वाहतूक पोलिसांचा अजब आणि अनोखा उपक्रम पाहून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांची चांगलीच पाचावर धारण बसली. परंतु तिळाच्या लाडूसहित हातात दंड आकारल्याचे चलन पाहून अनेक चालक हैराण दिसले. आपल्याला चांगलीच अद्दल घडल्याचे लक्षात येताच काही चालकांनी शरमेने मान झुकवत घटनास्थळावरून तत्काळ पळ काढण्याचा प्रयत्न केला.

रुईया महाविद्यालयाच्या विध्यार्थानी हातात रस्ते सुरक्षा सप्ताहचे फलक घेऊन भररस्त्यात पथनाट्य सादर करीत वाहनचालकांचे आपल्याकडे लक्ष वेधले. वाहतूक नियमांचे पालन करा सीट बेल्ट लावा, हेल्मेटचा वापर करा असे आवाहन करीत होते. त्याचबरोबर वाहतूक नियमांचे कार्ड चालकांच्या हातात ठेवले.

पुढील बातमी
इतर बातम्या