चाचणी यशस्वी, पण गोरेगावपर्यंत हार्बरला मुहूर्त कधी?

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • परिवहन

रेल्वे प्रवाशांना लवकरच सीएसएमटी ते गोरेगाव अशा हार्बर मार्गाने प्रवास करता येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर मंगळवारी अंधेरी ते गोरेगाव दरम्यान रेल्वेकडून चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात हार्बर लोकल गोरेगावपर्यंत धावणार आहे. त्याचा फायदा हार्बर मार्गावरील लाखो प्रवाशांना होणार आहे.

अंधेरी, वांद्रे, दादरची गर्दी कमी होणार

गोरेगावपर्यंत हार्बर मार्गाचा विस्तार झाल्यानंतर पश्चिम रेल्वेवरील गर्दी थोड्या प्रमाणात का होईना कमी होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे. आतापर्यंत सीएसएमटी ते अंधेरी असा हार्बर मार्ग होता. पण, आता हा मार्ग गोरेगावपर्यंत विस्तारणार असल्याने अंधेरीसोबतच पुढे वांद्रे आणि दादर स्थानकातील गर्दीही कमी होणार आहे.

कधी झाली चाचणी?

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून ही चाचणी मंगळवारी सकाळी १० ते दुपारी ३ च्या दरम्यान घेण्यात आली. हार्बर मार्गाची सेवा गोरेगावपर्यंत व्हावी, अशी प्रवाशांची मागणी होती. त्या मागणीनंतर २००८ ला हा निर्णय घेण्यात आला.

ताशी १०० किमी

मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट २ अंतर्गत गोरेगावपर्यंत हार्बर विस्तारीकरणाचं काम पूर्ण करण्यात आलं. नव्याने काम करण्यात आलेल्या रुळांवर अप आणि डाऊन मार्गावर ताशी १०० किमी या वेगाने लोकल चाचणी घेण्यात आली.

तारखेची घोषणा

रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून चाचणी मंजूर अहवाल पश्चिम रेल्वेला प्राप्त झाल्यानंतर पश्चिम रेल्वे अधिकृतपणे तारखेची घोषणा करणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून थेट गोरेगावपर्यंत हार्बर लोकल धावणार आहे.

त्यानुसार पुढच्या दोन आठवड्यात म्हणजे फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा किंवा मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात सीएसएमटी ते गोरेगाव हार्बर मार्गावरील सेवा सुरू होऊ शकेल, असं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी स्पष्ट केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या