उबरची ‘सेल्फी’श पॉलिसी

मुंबई - उबर टॅक्सीत रोमान्स आणि फ्लर्ट करण्यास बंदी आणल्यानंतर आता उबरने आपला मोर्चा थेट वाहनचालकांकडे वळवला आहे. उबर टॅक्सी चालकांना प्रत्येक भाडे नेताना स्टेअरिंग पकडलेला सेल्फी काढून तो उबर कंपनीला पाठवणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. उबरच्या नव्या पॉलिसीनुसार वाहनचालकासाठी एक अॅप तयार करण्यात आला असून या सेल्फीद्वारे नोंदणी करणारा ड्रायव्हर आणि प्रत्यक्षात टॅक्सी चालवणारा ड्रायव्हर एकच आहे ना हे तपासण्यासाठी ही नवी पॉलिसी आणल्याची माहिती उबरच्या प्रवक्त्यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे.

उबर टॅक्सीचे स्टेअरिंग दुसऱ्या कुणा वाहनचालकांच्या हातात देत कंपनीची फसणवूक वाहनचालकांकडून सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो, असे म्हणत उबरनेही पॉलिसी आणली आहे. त्यानुसार रिअल टाईम चेकसाठी सेल्फी बंधनकारक करण्याचा निर्णय उबर कंपनीने घेतला आहे.

उबरकडे नोंदणी झालेला वाहनचालकच टॅक्सी चालवत आहे ना हे तपासणे या नव्या अॅप आणि सेल्फीमुळे होईल असा दावा कंपनीने केला आहे. सध्या ही पॉलिसी मुंबई, दिल्ली, बंगळूर, कोलकत्ता आणि हैद्राबाद शहरात राबवण्यात आली आहे. टॅक्सीचालक मात्र उबरच्या या सेल्फीश पॉलिसीवर प्रचंड नाराज आहेत. एक तर या कंपनीने आमची फसणवूक करत आमच्यावर उपासमारीची वेळ आणली आहे. एककीडे टॅक्सी वाढल्याने धंदा कमी झाला असताना दुसरीकडे रोमान्स, फ्लर्ट करायचं नाही, टॅक्सीत कचरा टाकायचा नाही, अशा अटी घालत प्रवाशांची संख्या आणखी कमी करण्याचा घाट घातला आहे. त्यात भर म्हणून आता हे सेल्फीचे खुळ आणल्याचे म्हणत या पॉलिसीवर टीका केली आहे. एकूणच ही पॉलिसी टॅक्सीचालकांवर दबाव आणत टॅक्सींची संख्या कमी करण्यासाठी असल्याचा आरोप टॅक्सीचालक के.के.तिवारी यांनी केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या