फुकट्यांना 'परे'चा दणका

मुंबईची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या रेल्वेतून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र यामध्ये काही असे प्रवासी आहेत कि जे रेल्वेने फुकट प्रवास करणे पसंत करतात. मात्र अशा प्रवाशांना 'परे'ने गेल्या महिन्याभरात चांगलाच दणका दिल्याचे पहायला मिळालं आहे. पश्चिम रेल्वेने एका महिन्यात जवळपास 8 कोटींचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे रेल्वे प्रशासनाने एकूण 1 लाख 97 हजार गुन्ह्यांची नोंद केली आहे. तिकीट न काढणं,लोकलच्या तिकिटावर एक्स्प्रेसचा प्रवास यासारख्या गुन्ह्यांतर्गत दोषी प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, मार्च महिन्यात 8 कोटी 63 लाखांचा दंड वसूल करण्यात रेल्वेला यश आले आहे.

विशेष मोहीमेअंतर्गत प्रत्येक स्थानकावर टिसीची व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे बोर्डाच्या नियमानुसार, 500 प्रवाशांमागे 1 तिकीट तपासनीस असणे आवश्यक आहे. पश्‍चिम रेल्वेवरील 40 लाख प्रवाशांच्या तुलनेत उपलब्ध तिकीट तपासनीसांची संख्या तुटपुंजी आहे. मार्च महिन्यामध्ये तिकीट चोरांना आणि इतर संशयित व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून, 321 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दोषींवर रेल्वेच्या नियमानुसार खटले दाखल करण्यात आले आहेत. तसंच 12 वर्षांखालील 114 विद्यार्थ्यांना महिलांच्या डब्यातून प्रवास करताना पकडण्यात आलं आहे. प्रशासनातर्फे विनातिकीट प्रवास करणार्‍यांविरूद्ध कडक कारवाई करण्याची मोहीम सुरूच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी अधिकृत तिकीट केंद्रांवरून तिकीट काढूनच प्रवास करावा, असे पश्‍चिम रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी आवाहम केले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या