'परे'वरून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून १३ कोटींचा दंड वसूल

लोकलमधून विनातिकीट प्रवास करणे कायद्यानं गुन्हा असून, याबाबत रेल्वेला सहकार्य कराव, असं वारंवार प्रवासादरम्यान ऐकायला येतं. मात्र, तरीही अनेक प्रवासी रेल्वेचे नियम मोडून लोकलेन विनातिकीट प्रवास करत आहेत. या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी अनेक मोहिमा आणि अभियान राबविण्यात येत आहेत. या मोहिम आणि अभियानाद्वारे मार्च महिन्यात पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल १३ कोटी ४६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

विनातिकीट प्रवाशांमध्ये वाढ

मार्च महिन्यात पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण २ लाख ४५ हजार प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. तसंच, यामधून १३ कोटी ४६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्यानं मागील वर्षीपेक्षा या वर्षी दंडाच्या रकमेत ४९.८७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह रेल्वे प्रशासनानं रेल्वे परिसरातील ३२९ गर्दुल्ले आणि ६३१ अनधिकृत फेरीवाल्यांना परिसरातून बाहेर काढलं आहे. त्याशिवाय, आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम न भरणाऱ्या २५८ जणांना तुरुंगात पाठविण्यात आलं आहे.

दंडात्मक कारवाई

रेल्वे प्रशासनानं मार्च महिन्यात २५२ तिकीट दलालांविरोधात चौकशी केली. त्यावेळी २५२ दलालांपैकी १४४ जणांना पकडण्यात आलं आहे. तसंच, त्याच्यावर रेल्वे कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणं, महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या १२ वर्षे तसंच त्यापुढील वर्षांच्या मुलांना पकडण्यासाठी सुरक्षिणी पथक तैनात करण्यात आले आहे. अशा ६१ मुलांना मार्च महिन्यात ताब्यात घेण्यात आले आहे.


हेही वाचा -

प्राप्तीकर विभागाची मुंबई विद्यापीठाला ५० कोटींची नोटीस

मानखुर्द स्थानकात तांत्रिक बिघाड, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत


पुढील बातमी
इतर बातम्या