पश्चिम रेल्वे झाली 150 वर्षांची

भारतीय रेल्वेच्या इतिहासात बरोबर 150 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजेच 12 एप्रिल रोजी पश्चिम रेल्वेची सेवा सुरू करण्यात आली होती. पश्चिम रेल्वेने मंगळवारी 150 वर्षे पूर्ण केली आहेत. मुंबई बडोदा आणि मध्य भारतीय रेल्वेने संयुक्तपणे हा उपक्रम सुरू केला होता.

त्यावेळी विरारहून पहिली रेल्वे सकाळी 6.45 ला बॅकबेसाठी रवाना झाली होती. ही गाडी नील(नालासोपारा), बॅसिन(वसई), पांजो(वसई खाडीच्या मध्ये), बेरेवला(बोरिवली), पहाडी(गोरेगांव), अंदारू (अंधेरी), सांताक्रूझ, बंदोरा (वांद्रे), माहिम, दादुरे (दादर) आणि ग्रँट रोड या स्थानकांवर थांबवण्यात आली होती.त्या काळात पश्चिम रेल्वेत तीन श्रेणी होत्या. सर्वसामान्य मुंबईकर त्यावेळी 7 आणे भाडे असलेल्या दुसऱ्या श्रेणीच्या डब्यातून प्रवास करत असत, तर तिसऱ्या श्रेणीसाठी केवळ 3 आणे भाडे आकारण्यात येत होते. महिलांसाठी दुसऱ्या श्रेणीचा एक विशेष डबा जोडण्यात येत असे, तसेच धुम्रपान करण्यासाठी डब्यातच विशेष क्षेत्र निर्माण करण्यात आले होते.

त्याकाळी या मार्गावर स्थानकांची संख्या कमी असल्यामुळे गाडीला विरार ते बॅकबे अंतर कापण्यास कमी वेळ लागत असे. त्यावेळेसच या रेल्वेला लोकल असे संबोधण्यास सरुवात झाली. काळानुरूप पश्चिम रेल्वेनेही स्वत:मध्ये अनेक बदल केले आणि आता हळूहळू डिजिटल युगाकडे सरकत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या