Mumbai Local ट्रेनमध्ये बसायला सीट मिळावी म्हणून महिलांनी लावले धमकीवजा विनंती देणारे पोस्टर्स

Exclusive
Exclusive

पश्चिम रेल्वे लाईनवर असलेल्या विरार स्टेशनवरून सुटणारी ट्रेन आणि गर्दीचं एक वेगळंच नातं आहे. असे विरार फास्ट लोकलचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. असाच एक व्हिडिओ आता इंटरनेटवर फिरत आहे. तर १२ जानेवारी २०२४ च्या सकाळी विरारहून सुटलेल्या ८:२३ च्या दादर फास्ट लोकलमधील हा व्हिडिओ आहे. तिथल्या लेडीज डब्यात हे असे गंमतीदार पोस्टर पाहायला मिळाले. पण हे असे पोस्टर कोणी आणि का लावले असतील? 

या पोस्टरवरची भाषा वाचून अनेकांनी मराठीच्या व्याकरणाबद्दल चुका काढल्या आहेत. तर अनेकांनी हा खरंच किती लोकांना रोजचा त्रास आहे, यावर लक्ष दिलं आहे.

त्या पोस्टरवर लिहलं आहे की, "खास करूण नालासोपारा डाउन लेडी़ज आनी सर्व मुलिन साठी | कृपया ,माणुसकी म्हणून 4 स्टेशन तरी तुमच्या समोर उभे असतील त्यांना बसायला द्यावे. आदेशावरून,. सर्व कामकाजी महिलाप्रवाशी" 

सगळ्या मुंबईकरांना माहित असेलच विरार ते चर्चगेट ट्रेनला किती भरगच्च गर्दी असते. त्यात होतं काय, विरारला जाणाऱ्या ट्रेनमध्ये नालासोपाराचे प्रवाशी चढतात. मग ती ट्रेन विरारला पोहोचण्याआधीच गच्च भरलेली असते. त्यामुळे विरारला चढणाऱ्या प्रवाशांना सीट मिळत नाही. सीट तर जाऊ द्या, नीट उभं राहायलाही जागा मिळत नाही. मग या गच्च भरलेल्या ट्रेनमध्ये, इतरांचे धक्के खात एक-दिड तास उभं राहून प्रवास करावा लागतो आणि कोणीही थोड्या वेळासाठी सुद्धा बसायला देत नाही.

कितीही नव्या ट्रेन सुरू केल्या तरी अवस्था आहे तशीच आहे. ट्रेनच्या फेऱ्यांसोबत गर्दीसुद्धा वाढतेच आहे. म्हणून अशाच कोणी कंटाळलेल्या महिला प्रवाशांनी असे विनंतीवजा धमकी देणारे पोस्टर ट्रेनमध्ये लावले आहेत. त्यांना आशा आहे की आतातरी कुणी त्यांना बसायला जागा देईल. विरारवरून चढणाऱ्या प्रवाशांना भरलेल्या ट्रेनमध्ये उभं राहावं लागतं त्यामुळे हे पोस्टर्स विरारच्याच महिलांनी लावले असतील, अशी कुजबुज आहे.

या महिलांनी केलेली ही विनंती तुम्हाला रास्त वाटते का? ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली? तुमच्या ट्रेनच्या ग्रुपसोबत नक्की शेअर करा.  

पुढील बातमी
इतर बातम्या