रेल्वेला का वाचवतायेत मुंबई पोलीस?


रेल्वेला का वाचवतायेत मुंबई पोलीस?
SHARES

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकात झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत २२ मुंबईकर प्रवाशांचा बळी गेला आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आव एकीकडे रेल्वे प्रशासनाने आणला आहे, तर दुसरीकडे मुंबई पोलिसांनी देखील केवळ अपघाती मृत्यूची नोंद करत झालेल्या प्रकारावर 'पांघरून' घालण्याचा प्रयत्न केला आहे. हा अतिशय संतापजनक प्रकार असून या घटनेला जबाबदार रेल्वे अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.

एल्फिन्स्टन स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीत २२ लोकांच्या मृत्यू प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केल्याची माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते दीपक देवराज यांनी दिली आहे. दरम्यान दुर्घटना घडल्यावर मुंबई पाेलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दुर्घटना स्थळाची पाहणी केली. 

मात्र, एवढी मोठी दुर्घटना घडून २२ प्रवाशांचे प्राण जातात, तिथे मुंबई पोलीस केवळ अपघाती मृत्यूची नोंद कशी करू शकतात, असा सवाल रेल्वे कार्यकर्ते समीर झव्हेरी यांनी विचारला आहे. या प्रकरणी रेल्वे जनरल मॅनेजर, विभागीय जनरल मॅनेजर आणि सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची गरज असल्याची मागणी त्यांनी केली आहे.


ही तर काळ्या दगडावरची रेघ

पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन स्थानक ते मध्य रेल्वेचे परळ स्थानक यांना जोडणाऱ्या पादचारी पुलावर रोजच मोठी गर्दी होते. हा पादचारी पूल अत्यंत अरुंद असल्याने एकाच वेळी दोन्ही स्थानकांवर गाड्या आल्यास स्थानकातून बाहेर पडणाऱ्या आणि आत शिरणाऱ्या प्रवाशांची या पुलावर प्रचंड गर्दी होते.

एकमेकांना धक्के देत पुढे चालत राहण्याशिवाय या प्रवाशांकडे कुठलाही दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे रोज लहानसहान दुर्घटना घडणाऱ्या या पुलावर असा मोठा अपघात घडणे ही काळ्या दगडावरची रेघ होती. अखेर हा दुर्दैवी दिवस उजाडलाच.

दक्षिण मध्य मुंबईचे खा. राहुल शेवाळे यांनी २३ एप्रिल २०१५ ला स्वतः तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना पत्र लिहून एल्फिन्स्टन स्थानकावरील रेल्वे पुलाच्या रुंदीकरणाची मागणी केली होती. त्यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनीही अशीची मागणी केली. पण पुढे काहीच हालचाल झाली नाही.

एखाद्या लहानसहान घटनेतही तात्काळ गुन्हा नोंदवणारी पोलीस यंत्रणा रेल्वे प्रशासनाविरोधात गुन्हा का नोंदवत नाही? असा सवाल रेल्वे प्रवासी करू लागले आहेत.



हेही वाचा -

एल्फिन्स्टन रेल्वे दुर्घटना: ‘या’ ६ हातांनी वाचवले शेकडो प्रवाशांचे प्राण 

येस… आय अॅम गिल्टी!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा