Advertisement

येस… आय अॅम गिल्टी!


येस… आय अॅम गिल्टी!
SHARES

"काय सांगता, 22 जण मेले? अरेरे वाईट झालं..."
"याला सरकार जबाबदार आहे..."
"बुलेट ट्रेन कशाला हवी? आधी रेल्वे नीट करा..."

अहो, एलफिन्स्टन रोड (की प्रभादेवी?) स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीसारखे अपघात ऐतिहासिक का समजताय? आमच्यासाठी 'रोज मरे, त्यास कोण रडे' ही म्हण म्हणजे सुविचार झालाय हो...

आमच्या मुंबईचं स्पिरीट जगाच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे, तुम्हाला माहितीच आहे की... बॉम्बस्फोट होवो, पावसाने जलप्रलय होवो, अगदी मुंबईवर कसाबसारखे दहाजण येऊन गोळ्या झाडून हल्ला करोत... आम्ही कधीही थांबत नाही!

काहीही झालं, तरी जगणं हा आमचा अधिकार आहे आणि तो आम्ही निभावणारच!

वाढते लोंढे हे आमच्या मानवतावादी दृष्टिकोनाचे लक्षण आहे. त्यांना चिरीमिरी घेऊन का होईना पण सर्व सोयी-सुविधा पुरवणे हा आमचा नवा धर्म आहे.

भ्रष्टाचार हाच आमचा शिष्टाचार आहे. मुळात 'मुंबई आमची' म्हणणाऱ्यांचं मूळ मुंबईत आहेच कुठे? त्यामुळे, मुंबईची वाट लागली, तरी आम्ही थांबणार नाहीच. मुंबई सतत कार्यरत राहणार. तीही आमच्यासारख्या अस्सल मुंबईकरांमुळेच!

सिग्नलवर मामाने पकडलं तर 200 रुपयांची पावती फाडण्याऐवजी चहा-पाणी देण्याचं बार्गेनिंग आम्हाला चांगलं जमतं आणि पुन्हा नव्याने सिग्नल मोडायलाही आम्हाला लाज वाटत नाही. कारण माहितीये? कारण एकच... निर्लज्जम सदासुखी!

तर, असे सदासुखी राहणारे आम्ही प्रत्येक दुर्घटनेची जबाबदारी कुणावर तरी टाकण्यासाठी धडपडत असतो. कधी राजकारणी, कधी अधिकारी, कधी आमचे आम्हीच... जबाबदारी घेण्याऐवजी जबाबदारी ढकलण्याचंच शिक्षण आम्हाला मिळालंय हो... आता बघा ना, शाळेतही डिझास्टर मॅनेजमेंटचा विषय शिकवण्याबाबत उदासीनता असली तरी आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही.

असो, आताही कुणाचा ना कुणाचा बळी द्यायला हवाच की... मग, रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा दिला किंवा घेतला, एखाद्या अधिकाऱ्याला सस्पेंड केलं, चौकशी समिती नेमली की आम्ही खूष होतो आणि गप्प बसतो...

तशी रोजच प्रत्येक स्टेशनवर चेंगराचेंगरी होते हो... रोजच जखमी होणाऱ्यांना आज 22 जण मेल्यामुळे फुकटात उपचार मिळालेत, याचंही आम्हाला समाधानच वाटतंय बरं.

आता, ऐन नवरात्रात परळ ब्रीजसाठी मुंबईकरांनीच सामूहिक बळी दिल्याने आता रेल्वे जागे होईल आणि किमान परळ ब्रीजचा प्रश्न सुटेल, याची आम्हाला खात्री आहे. आता, याचा काहींना राग येईल, पण आमचं तर बाबा असंच मत आहे.

आमचे राजकारणीही बघा किती तत्पर आहेत ते... दुर्घटना झाली आणि लगेच कॅमेऱ्यांसमोर बाईट की काय ते द्यायला हजर झाले. काहींनी तर अगदी स्वतःचे बाईट स्वतःच घेऊन व्हॉट्सअॅपवर पाठवून दिले बरं. यालाच म्हणतात डिजीटल इंडिया!

जाऊ द्या, तुम्ही काय लक्ष देताय? 24 तास दाखवायचं तरी काय हा आमच्या मीडियाचा प्रश्न आम्ही मुंबईकर कुठल्या ना कुठल्या प्रकारे सोडवत असतोच. त्याचंच हे उदाहरण आहे बरं.

एकूणच काय, तर आमचं स्पिरिट इतकं भारी आहे की रोजचं स्वस्त मरणही आमची झिंग उतरवू शकत नाही. त्यामुळेच व्होटबँकेचं राजकारण, नेते-अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचं नेक्सस आमच्यावर वर्षानुवर्षे सहजपणे राज्य करतंय आणि आम्हीही अजून ब्रिटिशांच्या राज्याप्रमाणेच या नव्या राजेशाहीचा मान ठेवतोय.

म्हणूनच म्हणतोय, येस आय अॅम गिल्टी, बट शूड नॉट बी पनिश्ड !



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा