Advertisement

सुनील बर्वे म्हणतोय 'जागते रहो'


सुनील बर्वे म्हणतोय 'जागते रहो'
SHARES

अभिनेता-निर्माता सुनील बर्वेनं नेहमीच वेगळ्या वाटेनं जात काहीसं नावीन्यपूर्ण कामाला प्राधान्य दिलं आहे. मग ते जुन्या नाटकांना नवीन संचात आणण्याचं काम असो वा, एखादी लक्षवेधी भूमिका साकारण्याचं काम असो, सुनील नेहमीच वेगळी वाट चोखळताना दिसतो. अशी एक वेगळी वाट चोखळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सुनील बर्वेनं केला आहे. 'जागते रहो' हा नवीन शो घेऊन आता सुनील बर्वे प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या शोद्वारे पुन्हा एकदा सुनील बर्वे आपल्याकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत नागरिकांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीनं जनजागृती करणार आहे.

दैनंदिन जीवनात सर्वांनीच डोळसपणे वावरण्याची गरज आहे. असं झालं नाही तर कधीही आपल्याला दगा फटका होऊ शकतो. कुठलीही दुर्घटना पूर्वसूचना देऊन येत नसते. बऱ्याचदा आपल्या विश्वासातली, आपल्या जवळची व्यक्तीच या दुर्घटनांना जबाबदार असते किंवा आपण आपल्या नकळत काही गुन्ह्यांना ओढवून घेतो. संस्कृती प्रिय, कलानिष्ठ अशा आपल्या महाराष्ट्रात दररोज काळजाचा थरकाप उडविणाऱ्या, मन छिन्नविच्छिन्न करणाऱ्या काही खळबळजनक बातम्या कानावर येतात. अशा बातम्यांनी सामाजिक शांती तसेच सुरक्षेला तडा जातो. या आणि अशाच घटनांपासून सावध करण्यासाठी 'जागते रहो' म्हणत सुनील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

अंगावर शहारे आणणाऱ्या अनेक घटना असुरक्षिततेची भावना निर्माण करतात, पण ही गुन्हेगारी का बोकाळते याचा विचार केला तर या घटनांचं मूळ लक्षात येईल. बहुतांशी याला आपणच जबाबदार असतो. आपल्या या महाराष्ट्राला या गुन्ह्यांमुळे गालबोट लागू न देण्याची जबाबदारी नागरिक म्हणून आपलीही आहे. त्यामुळे वेळीच जागरूक होण गरजेचं आहे. याच सूत्रावर आधारित 'महाराष्ट्र जागते रहो – अजूनही वेळ गेली नाही' हा एक नवा कार्यक्रम कलर्स मराठी वाहिनी प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी सुनील बर्वेकडे सोपवण्यात आली आहे.



३० जानेवारीपासून शो प्रेक्षकांच्या भेटीला

कलर्स मराठी वाहिनीवर ३० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या 'महाराष्ट्र जागते रहो - अजूनही वेळ गेली नाही' या कार्यक्रमाद्वारे पहिल्यांदाच सूत्रसंचालकाची धुरा सुनील सांभाळणार आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला की, बऱ्याच वर्षांपासून काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. 'महाराष्ट्र जागते रहो - अजूनही वेळ गेली नाही' सारखा वेगळा कार्यक्रम करण्याची संधी मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. आपला महाराष्ट्र सगळ्या गोष्टीत अग्रेसर आहे, तसाच तो गुन्हेगारीच्या रेकॉर्डसमध्ये देखील अग्रेसर असल्याचं कळल्यावर खूप वाईट वाटलं. आपण अनावधानं अनेक गोष्टी बोलून जातो, ज्यामुळेच खरंतर संकट ओढावतं आणि नंतर त्यातूनच गुन्हेगारी घडते. तर अशा दुर्लक्षिलेल्या वागण्यासाठी तुम्हाला सतर्क करणारा हा कार्यक्रम असणार आहे.


प्रेक्षकांना सतर्क करणं हाच हेतू

या कार्यक्रमाविषयी बोलताना प्रमुख, मराठी मनोरंजन विभाग वायाकॉम१८चे निखिल साने म्हणाले की, जेव्हा आम्ही गुन्हेगारी हा विषय हाती घेतला, तेव्हा असं लक्षात आलं कि, या विषयाची पार्श्वभूमी असलेल्या अनेक मालिका हिंदी वाहिन्यांवर आहेत, परंतु मराठीत मात्र याची कमतरता आहे. ही मालिका करताना नुसता हा विषय मराठीत नाही म्हणून वाहिनीवर आणावा ही त्यामागची भूमिका नव्हती. तर मराठी प्रेक्षकांना सतर्क करणं आणि या गुन्हेगारी वृत्तीपासून समाजाला कशाप्रकारे दक्षता घ्यावी हे कळावं हाच हा कार्यक्रम करण्यामागचा उद्देश आहे. यात आनंदाची गोष्ट अशी कि, सुनील बर्वेसारखे वरिष्ठ कलाकार ज्यांची ओळख महाराष्ट्रातल्या सर्व कुटुंबात आहे ते या कार्यक्रमाचा खूप महत्वाचा भाग आहेत.



हेही वाचा -

'आनंदी गोपाळ'मध्ये भेटणार भारतातील पहिल्या महिला डॉक्टर

'परफ्युम'मधून ओंकारचं सिनेसृष्टीत पदार्पण! 



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा