Advertisement

'परफ्युम'मधून ओंकारचं सिनेसृष्टीत पदार्पण!!

ओंकार दीक्षित हा एक नवा चेहरा 'परफ्युम' या चित्रपटाद्वारे चंदेरी दुनियेत दाखल होत आहे. चित्रपटातील भूमिकेसाठी ओंकारनं प्रचंड मेहनत घेतली आहे.

'परफ्युम'मधून ओंकारचं सिनेसृष्टीत पदार्पण!!
SHARES

चंदेरी दुनिया आणि रुपेरी पडद्याचं आकर्षण भल्याभल्यांना इथे खेचून आणतं. त्यामुळेच दिवसागणिक नवनवीन चेहरे आपलं नशीब आजमावण्यासाठी या दुनियेत दाखल होत असतात. असाच ओंकार दीक्षित हा एक नवा चेहरा 'परफ्युम' या चित्रपटाद्वारे चंदेरी दुनियेत दाखल होत आहे.

स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सज्ज

खरं तर नवीन कलाकारांची एंट्री होणं हे सिनेमाच्या कथा आणि विषयावर अवलंबून असतं. काही नवीन कलाकार खरोखर सिनेमाच्या विषयाला आणि कथानकाला न्याय देत संपूर्ण टिमला नवी ऊर्जा देण्याचं काम करतात. ओंकारही अशाच प्रकारची काहीतरी लक्षवेधी कामगिरी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'हलाल' या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती, तसंच 'लेथ जोशी' या चित्रपटाची प्रस्तुती करणाऱ्या अमोल कागणे फिल्म्सच्या अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनी 'परफ्युम'ची प्रस्तुती केल्याने या सिनेमाकडे लक्ष वेधलं जात आहे.


अविस्मरणीय अनुभव

प्रथमच कॅमेरा फेस करण्याच्या अनुभवाबाबत ओंकार म्हणाला की, 'परफ्युम' या चित्रपटात गरीब घरातील संघर्ष करणाऱ्या मुलाची भूमिका साकारली आहे. त्याच्या आयुष्यात एक मुलगी येते आणि त्याचं आयुष्य कसं बदलतं हे या चित्रपटात दाखवलं आहे. चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना ही भूमिका करण्याची संधी मिळाल्याने हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. हा प्रवास २०१६ पासून सुरू झाला. त्यावेळी माझं वजन खूपच कमी होतं. त्यामुळे खूप शारीरिक मेहनतही करावी लागली. वजन वाढवण्यासाठी जिमला गेलो. स्विमिंग, सायकलिंग शिकलो. भाषेवर, अभिनयावर, हावभावांवर काम करत या भूमिकेचे कंगोरे उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

१ मार्चला प्रदर्शित

या सिनेमाचं दिग्दर्शन करण तांदळे यांनी केलं असून, कॅमेरावर्कही त्यांचंच आहे. किशोर गिऱ्हे यांनी या सिनेमाची कथा लिहीली आहे. ओंकारसोबत या सिनेमात मोनालिसा बागल मुख्य भूमिकेत आहे. या जोडीला सयाजी शिंदे, चिन्मय मांडलेकर, भाग्यश्री न्हालवे, अभिजित चव्हाण, अनिल नगरकर, कमलेश सावंत यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. १ मार्चपासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा

मिकाचं मराठमोळं गाणं देणार 'डोक्याला शॉट'!

रंगभूमीवर अवतरलं 'अजिंक्य योद्धा'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा