Advertisement

रंगभूमीवर अवतरलं 'अजिंक्य योद्धा'

महानाट्यांच्या या परंपरेत आता आणखी एक नवं नाट्य सामील झालं आहे. ‘अजिंक्य योद्धा’ हे महानाट्य नुकतंच मराठी रंगभूमीवर अवतरलं आहे.

रंगभूमीवर अवतरलं 'अजिंक्य योद्धा'
SHARES

मराठी रंगभूमीला महानाट्यांची खूप मोठी परंपरा लाभली आहे. महानाट्यांच्या या परंपरेत आता आणखी एक नवं नाट्य सामील झालं आहे. ‘अजिंक्य योद्धा’ हे महानाट्य नुकतंच मराठी रंगभूमीवर अवतरलं आहे.


अजिंक्य योद्धाही सज्ज 

छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरीत्र वर्णन करणाऱ्या ‘जाणता राजा’ या महानाट्याने केवळ मराठीच नव्हे, तर इतर भाषिक रसिकांचंही लक्ष वेधून घेतलं होतं. याच वाटेने जात नंतर इतिहासातील बऱ्याच व्यक्तीरेखांसोबत संत-महात्म्यांच्या जीवन चरित्रही महानाट्याच्या माध्यमातून सादर करण्यात आली. यात श्री साईबाबा, श्री स्वामी समर्थ, डा. बाबसाहेब आंबेडकर इत्यादींसोबतच रामायण आणि महाभारता या महाकाव्यांवर आधारित असलेल्या महानाट्यानेही रसिकांचं मनोरंजन केलं आहे. हाच वारसा पुढे चालवत ‘अजिंक्य योद्धा’ सज्ज झालं आहे.


महानाट्याचा भव्य शुभारंभ

हिंदू साम्राज्याचा ध्यास घेऊन कायमच अपराजित राहिलेले सेनानायक, ज्यांनी युगपुरुष शिवाजी महाराजांचे हिंदू साम्राज्य प्रस्थापित करण्याचं स्वप्न बऱ्याच अंशी सत्यात उतरवलं, दिल्लीत भगवा फडकावणारे पहिले मराठी सेनानी, शक्ती आणि बुद्धीचा अद्वितीय संगम असलेल्या बाजीराव पेशव्यांच्या जीवनावर आधारित असलेलं 'अजिंक्य योद्धा - श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ' या महानाट्याचा भव्य शुभारंभ अंधेरी येथील होली फॅमिली पटांगणात नुकताच झाला.


अमृता फडणवीस प्रमुख पाहुण्या

शुभारंभाच्या प्रयोगाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यासोबतच भाजपाचे मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अमित साटम, गायक नंदेश उमप, आदर्श शिंदे आदी मंडळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होती. या नाटकात बाजीराव पेशवे यांची भूमिका साकारणाऱ्या गष्मिर महाजनीचे वडील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांनीही या प्रयोगाला सपत्नीक हजेरी लावली होती. 


पेशवेंची वैशिष्ट्ये अचूकपणे टिपण्यात यश

या महानाट्याचं आयोजन केसरबेन पटेल यांनी केलं होतं. ‘अजिंक्य योद्धा’ या महानाट्यात युद्धनीतीतील बारकावे, गनिमी कावे, शत्रूला मोक्याच्या ठिकाणी आणून पराजित करणं ही बाजीराव पेशवेंची वैशिष्ट्ये अचूकपणे टिपण्यात आली आहेत. १०० फूट लांबी, रुंदी असलेला भव्य-दिव्य रंगमंच, १३० कलाकार, उत्कृष्ट ध्वनी नियोजन, नेपथ्य, रंगसंगती, पेहराव या सर्वच गोष्टी अतिशय भव्य स्वरूपात आहेत. 

गष्मीरच्या जोडीला दीप्ती भागवतने काशीबाईची भूमिका साकारली असून,अर्चना सामंत मस्तानी बनली आहे. संजय पांडे यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या या महानाटकाची निर्मिती पंजाब टॉकीजने केली असून दिग्दर्शन वरुणा मदनलाल राणा यांनी केलं आहे. प्रताप गंगावणे लिखित या महानाट्याच्या कार्यकारी निर्मात्याची व सहाय्यक दिग्दर्शनाही धुरा अभय सोडये यांनी सांभाळली आहे. संगीत दिग्दर्शन आदी रामचंद्र यांचं असून, आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, नंदेश उमप, वैशाली माडे, आदी रामचंद्र यांनी गाणी गायली आहेत.



हेही वाचा -

स्वातंत्र्यवीरांच्या रूपात मराठी स्टार्स!

युथट्यूब'द्वारे निर्मितीकडे वळले मधुराणी-प्रमोद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा