Advertisement

उत्तर मध्य मुंबईत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सर्वाधिक उमेदवारः सर्वेक्षण

पालघर लोकसभा मतदारसंघात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार सर्वात कमी असल्याचे 'मुंबई व्होट'च्या विश्लेषणातून समोर आले आहे.

उत्तर मध्य मुंबईत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सर्वाधिक उमेदवारः सर्वेक्षण
SHARES

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून विविध गुन्ह्यांची नोंद असलेले सर्वाधिक उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार सर्वात कमी असल्याचे 'मुंबई व्होट'च्या विश्लेषणातून समोर आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'मुंबई व्होट्स' या संस्थेने मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघ, ठाणे, पालघर आणि कल्याण या 9 लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि त्यांचे राजकीय पक्ष, जाहीरनामे, उमेदवारांच्या संपत्तीत वाढ, गुन्हेगारी पार्श्वभूमी यांचे विश्लेषणात्मक निरीक्षण केले आहे. 

या संघटनेच्या अहवालानुसार, उत्तर मध्य मुंबईत विविध गुन्हेगारी नोंदी असलेले उमेदवार सर्वाधिक आहेत. तर पालघर लोकसभा मतदारसंघात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार सर्वात कमी आहेत. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण 27 उमेदवार, तर पालघर लोकसभा मतदारसंघात 10 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

दरम्यान, आंदोलनासारखे किरकोळ गुन्हे असलेल्या उमेदवारांच्या यादीत शिवसेनेचा ठाकरे गट पहिल्या, वंचित बहुजन आघाडी दुसऱ्या तर शिवसेनेचा शिंदे गट तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच खून, खंडणी, धमकावणे आदी गंभीर गुन्हे असलेल्या उमेदवारांच्या यादीत वंचित बहुजन आघाडी आघाडीवर असून समता पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आणि रिपब्लिकन बहुजन सेना तिसऱ्या क्रमांकावर आहे.

'मुंबई व्होट्स' या संस्थेने 185 उमेदवार आणि त्यांची प्रतिज्ञापत्रे, जवळपास 20 राजकीय पक्ष आणि 7 निवडणूक जाहीरनाम्यांचा अभ्यास केला. 'मुंबई व्होट्स' या संस्थेचे संस्थापक विवेक गिलानी यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत या अभ्यासातून निघालेल्या विविध निष्कर्षांचे तपशीलवार विश्लेषण केले.

'मुंबई व्होट्स' या संस्थेने भारतीय कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस, भाजप, शिवसेना ठाकरे गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), राष्ट्रवादी शरद पवार गट आणि तृणमूल काँग्रेस या सात राजकीय पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्यांचा अभ्यास केला. या अभ्यासानुसार, भाजपच्या 2024 च्या जाहीरनाम्याची 2019 सोबत तुलना केल्यावर, भाजपने 2019 मध्ये जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचे समोर आले आहे.

तसेच, तृणमूल काँग्रेस संबंधित मुद्द्यांना जाहीरनाम्यात विशेष महत्त्व देण्यात पहिल्या स्थानावर आहे. कृषी, आरोग्य, कामगार आणि रोजगार, कायदा क्षेत्र तर महिलांच्या विकासाच्या मुद्द्याला विशेष महत्त्व देण्यात काँग्रेस पहिल्या क्रमांकावर आहे आणि कायद्याच्या प्रश्नांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आरोग्य, कामगार, रोजगार या प्रश्नांनाही भाजपने विशेष महत्त्व दिले आहे.

पियुष गोयल हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत, तर श्रीकांत शिंदे यांचा संपत्ती वाढीचा दर सर्वाधिक आहे

संघटनेच्या अहवालानुसार, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उत्तर मुंबई लोकसभा उमेदवार पीयूष गोयल हे 110.96 कोटी रुपयांच्या संपत्तीसह सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यापाठोपाठ शिवसेनेच्या शिंदे गटाचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र वायकर यांची संपत्ती 54.21 कोटी आणि भारत जन आधार पार्टीचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुरिंदर अरोरा यांची संपत्ती 40.47 कोटी आहे.

तसेच, गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीनुसार मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचा संपत्ती वाढीचा दर सर्वाधिक 669 टक्के आहे. त्यापाठोपाठ दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील राहुल शेवाळे यांचा संपत्ती वाढीचा दर 619 टक्के आहे.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील 483 टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. तसेच, गेल्या पाच वर्षांत सर्वसामान्य नागरिकांच्या संपत्ती वाढीचा दर केवळ 3.5 टक्के राहिला आहे.



हेही वाचा

लोकसभा 2024: मतदाना दिवशी अपंग मतदारांसाठी विशेष बस सेवा

मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रावर अन्याय होतोय : शरद पवार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा