कालाघोडा परिसरात पुन्हा भरणार कलादालन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • कला

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून कालाघोडा परिसरात साकारलेले खुले आणि मुक्त कलादालन काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आले होते. मात्र येत्या १९ नोव्हेंबरपासून हे कलादालन पुन्हा एकदा सुरू होणार असून सर्व क्षेत्रातील कलाकारांना आपली कला याठिकाणी सादर करता येणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ(एमटीडीसी) व महापालिका प्रशासन संयुक्तपणे हे कलादालन सुरु करत असून सेलिब्रिटीजसह सर्व छोट्या-मोठ्या कलाकारांनी या कलादालनाला भेट देऊन या व्यासपीठाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

10 महिन्यांपासून बंद

नवोदित कलाकरांना आपली कला सादर करता यावी, यासाठी युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून काळा घोडा येथील के. दुभाष रोडवर कलादालनाच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते. २३ ऑगस्ट २०१६ला आदित्य ठाकरेंच्या हस्ते याचा शुभारंभ केल्यानंतर केवळ चार ते पाच रविवार हे कलादालन सुरु राहिले. परंतु, पुढे कलाकारांच्या थंड प्रतिसादामुळे मागील दहा महिन्यांपासून हे कलादालन बंद होते.

ए विभाग कार्यालयात नोंदणी

मात्र, अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांच्या पुढाकाराने पुन्हा हे कलादालन सुरु होत आहे. एमटीडीसीच्या माध्यमातून कलाकारांना माहिती दिली जाणार असून महापालिकेच्या वतीने जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. कलाकारांना आपली नोंद एमटीडीसीसोबतच महापालिकेच्या ए विभाग कार्यालयात करता येईल. यासाठी ए विभाग कार्यालयात एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूकही करण्यात आली आहे. यासाठी किरकोळ शुल्क आकारले जाणार आहे.

दर रविवारी भरणार दालन

दर रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ६ या वेळेत हे कलादालन भरणार आहे. याठिकाणी एकूण २० गाळे उपलब्ध करून दिले जाणार असून सर्व संगीतकार, गायक, चित्रकार, व्यंगचित्रकार आदींसह भारतातील ज्या लोककला आहेत, त्याही सादर करता येतील. महापालिकेच्या वतीने किरकोळ शुल्क हे केवळ त्यांना कला सादर करताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आकारले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी स्पष्ट केले.

शुभारंभदिनी सर्व कलावंताना आपापल्या कला सादर करावयाच्या असतील, त्यांंनी खालील क्रमांकावर दिनांक १३ नोव्हेंबर २०१७ पर्यंत नावे नोंदवावीत, असे आवाहन महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव (पर्यटन) नितीन गद्रे व अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी केले आहे.

इथे करा संपर्क

या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या कलाकारांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक स्वाती काळे (मोबाईल क्रमांक ८४२२८२२००३) व महानगरपालिका ‘ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर (मोबाईल क्रमांक ९९२०१८५२०१) यांच्याशी संपर्क साधावा, असेही महापालिकेकडून कळवण्यात आले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या