मुंबईतल्या खुल्या कलादालनाचा प्रयोग फसला

 Kala Ghoda
मुंबईतल्या खुल्या कलादालनाचा प्रयोग फसला
Kala Ghoda, Mumbai  -  

नवोदित कलावंतांना त्यांच्या कला सादर करण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि मुंबईकरांचा रविवार चित्र-संगीतमय करण्याच्या उद्देशाने काळा घोडा येथील के. दुभाष मार्गावर महापालिकेच्या वतीने खुले कलादालन सुरू करण्यात आले होते. मात्र कलाकारांनी याकडे पाठ फिरवल्याने कलादालनाच्या संकल्पनेचा गाशा महापालिकेला अवघ्या तीन महिन्यांत गुंडाळावा लागला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील खुले कलादालन 23 ऑक्टोबर 2016 ला आदित्य यांच्या हस्तेच सुरू करण्यात आले होते. रविवारी कलादालन सुरू रहावे यासाठी या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती, तशी परवानगी वाहतूक विभागाकडून घेण्यात आली होती. कलादालनातील एका दिवसाचे भुईभाडे परवडणारे नसल्यामुळे या खुल्या कलादालनाकडे कलाकारांनी पाठ फिरवली. 

के. दुभाष मार्गावरील रस्त्यावर 15 बाय 15 च्या एका बॉक्ससाठी कलाकारांना 450 रुपये मोजावे लागत होते. पालिकेने कलाकारांसाठी असे 20 बॉक्स तयार केले होते. त्यासाठी कलाकारांना पालिकेच्या ए विभाग कार्यालयात ऑनलाईन अर्ज करावा लागत होता. 23 ऑक्टोबरला सुरू झालेले खुले कलादालन फक्त 12 रविवार सुरू राहिले. त्यानंतर कलाकारांनी पाठ फिरवल्यामुळे तेथे पूर्ववत वाहन पार्किंग सुरू झाली आहे.

न्यूयार्क येथील टाइम स्क्वेअरच्या धर्तीवर कलादालन सुरू व्हावे यासाठी आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली होती. मेहता यांनीही या संकल्पनेला उचलून धरत काळा घोडा येथे कलादालन सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते.

जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या विदयार्थ्यांनी त्यांची कला तेथे दाखवावी यासाठी विदयार्थ्यांकडे प्रस्ताव घेऊन गेलो होतो. सुरुवातीला 12 आठवडे काही कलाकारांनी आपली कला तेथे सादर करण्यास उत्सुकता दाखवली. मात्र त्यानंतर जागेचे भाडे आणि आर्ट गॅलरी यामुळे त्यांनी याकडे पाठ फिरवली. त्यानंतर महापालिका निवडणुका आल्यामुळे तेथे लक्ष देता आले नसल्यामुळे कलादालन बंद झाले. पण ते पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहोत


- किरण दिघावकर, सहायक आयुक्त, ए विभाग

कला दालन बंद झाल्याची दखल घेतली आहे. उन्हाळ्यामुळे कलादालन मार्चपासून बंद ठेवले आहे. आर्ट्स महाविद्यालय आणि इतर महाविद्यालय यांच्या सध्या परीक्षा सुरू असून काहींना सुट्ट्या पडल्या आहेत. त्यामुळे जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून कलादालन पुन्हा सुरू करणार.


- आदित्य ठाकरे, युवासेना प्रमुख

Loading Comments