तैमूरच्या जन्मानंतर मागील काही दिवसांपासून करीना कपूरनं पुन्हा एकदा आपल्या करियरवर लक्ष केंद्रित केलं आहे. सध्या ती बाॅलीवूडमधील आघाडीच्या प्रोडक्शन हाऊसेसच्या बिग बजेट सिनेमांमध्ये लीड हिरोजसोबत काम करत आहे. यात करण जोहरच्या 'तख्त' या आगामी सिनेमाचाही समावेश आहे. या सिनेमातील राजकन्या प्रमाणिकपणे साकारता यावी यासाठी करीना सध्या उर्दू शिकत आहे.
आजवर 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'कभी अलविदा ना कहना', 'माय नेम इज खान', 'स्टुडंट ऑफ द इयर' या गाजलेल्या सिनेमांचं दिग्दर्शन करणारा करण जोहर जेव्हा एखाद्या सिनेमाची घोषणा करतो, तेव्हा सर्वांचंच लक्ष वेधून घेतो. करणनं जेव्हा 'तख्त' या आपल्या आगामी हिंदी सिनेमाची घोषणा केली तेव्हाही असंच घडलं. करणनं केलेल्या घोषणेनंतर त्याच्या सिनेमांच्या चाहत्यांना आता 'तख्त'चे वेध लागले आहेत. या सिनेमात करीना कपूर एका वेगळ्याच गेटअपमध्ये प्रेक्षकांना भेटणार आहे.
करीनासोबत रणवीर सिंग, अलिया भट, जान्हवी कपूर, भूमी पेडणेकर अशी हिंदीतील आघाडीच्या कलाकारांची भलीमोठी फळी या सिनेमात आहे. खरं तर या सिनेमाची कथा मुघलकालीन असल्यानं हे सर्वच कलाकार ऐतिहासिक रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. 'तख्त'ची टिम या सर्व कलाकारांच्या लुकवर कसून मेहनत घेत आहे. यातील करीनाचा लुकही आजवर तिनं आतापर्यंत साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा खूपच वेगळा असेल.
या सिनेमात करीना राजकुमारीच्या भूमिकेत दिसणार आहे. या राजकुमारीचं नाव आहे जहाँआरा बेगम. ही मुघलकालीन राजकन्या बदशहा शाहजहाँ यांची थोरली मुलगी आहे. आजवरच्या करियरमध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा ही भूमिका खूप वेगळी असल्याची जाण असलेली करीना सध्या या राजकुमारीवर खूप मेहनत घेत असल्याचं समजतं. औरंगजेब आणि दारा शिकोह या दोन मुघल राजांच्या जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमासाठी करीना सध्या उर्दूही शिकत आहे.
ही भूमिका उत्तर रीतीने साकारता यावी यासाठी करीनाला करणचं मार्गदर्शन लाभत आहेच, पण त्या जोडीलाच ती उर्दूचे उच्चार शुद्ध करण्यावरही भर देत आहे. या सिनेमाची पटकथा सुमीत रॅाय यांनी लिहिली असून, हुसैन हैदरी यांच्यासह त्यांनी संवादलेखनही केलं आहे. 'तख्त' या सिनेमाकडून करणला खूप अपेक्षा आहेत. आपल्या या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टवर तो मागील दोन वर्षांपासून काम करत आहे. या प्रवासात आता करीनासह सिनेमातील इतर कलाकारही सामील झाले आहेत. करीना सध्या अक्षय कुमारसोबत 'गुड न्यूज' या सिनेमाच्या चित्रीकरणात बिझी असून, यानंतर ती 'तख्त'साठी वेळ देणार असल्याचं समजतं.
हेही वाचा -
महाराष्ट्रात बीएसपी आणि सपा यांच्यात होणार युती?
श्रीमंतांच्या जागतिक यादीत मुकेश अंबानी १० व्या स्थानावर