अबब! २००० कोटींचा चित्रपट

मागील काही वर्षांपासून भारतीय चित्रपटसृष्टीलाही बिग बजेट चित्रपटांची स्वप्न पडू लागली आहेत. ४५० कोटींपर्यंत पोहोचलेला भारतीय चित्रपटाच्या बजेटचा आकडा आता २००० कोटींना गवसणी घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

हजार कोटी प्लस बजेट

होय, हॅालिवूडप्रमाणं लवकरच भारतातही हजार कोटींपेक्षा जास्त बजेट असलेले चित्रपट बनणार असल्याचे  संकेत मिळत आहेत. याची चाहूल मागील काही वर्षांपासूनच लागली आहे. १६५ कोटींचा 'दिलवाले', १७५ कोटींचा 'धूम ३', १८० कोटींचा 'प्रेम रतन धन पायो' आणि 'बाहुबली - द बिगिनींग', २१० कोटींचा 'टायगर झिंदा है' आणि 'ठग्ज आॅफ हिंदोस्तान', २१५ कोटींचा 'पद्मावत', २५० कोटींचा 'बाहुबली २', ३०० कोटींचा 'साहो' आणि ४५० कोटींचा '२.०' या चित्रपटांनी दाखवलेलं हजार कोटी प्लस बजेटचं स्वप्न आता लवकरच सत्यात अवतरणार असल्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

२००० कोटींचा तेलगू चित्रपट

हॅालिवूडमध्ये हजार प्लस बजेट असलेल्या चित्रपटांची संख्या खूप आहे, पण बॅालिवूडमध्ये तशा प्रकारचे चित्रपट बनवण्यासाठी तसं कथानक असणं गरजेचं असतं. या बाबतीत दक्षिणात्य चित्रपटसृष्टी बाजी मारणार असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. तेलुगू चित्रपटसृष्टीतील हुषार फिल्ममेकर त्रिविक्रम श्रीनिवास २००० कोटी रुपये बजेट असलेला चित्रपट बनवण्याची शक्यता आहे. त्रिविक्रम यांनी २००० मध्ये लिहिलेल्या 'नुवी कावेली' या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. हेच त्रिविक्रम भविष्यात २००० कोटींचं बजेट असलेला चित्रपट बनवू शकतात असे संकेत तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध काॅमेडीयन सुनील यांनी दिले आहेत. 

कथा उत्कठावर्धक

सुनीलनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबतची माहिती दिली आहे. सुनीलच्या म्हणण्यानुसार काही वर्षांपूर्वी त्रिविक्रम यांनी त्याला एक पटकथा ऐकवली होती. चित्रपटाची कथा उत्कठावर्धक आणि मनाला भिडणारी होती. त्यावेळी त्या चित्रपटाचं बजेट जवळजवळ ५०० कोटी रुपये इतकं होतं. दिवसेंदिवस महागाई वाढत असल्यानं आज जर तो चित्रपट करायचा ठरवलं तर बजेटचा आकडा अंदाजे २००० कोटी रुपयांच्या घरात जाईल. बजेट कितीही वाढलं तरी तो चित्रपट कधी ना कधी पडद्यावर येईल अशी खात्रीही सुनीलला वाटते.

चित्रपटाची उत्सुकता 

त्रिविक्रम यांनी २००२ मध्ये 'नुवी नुवी' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दिला जाणारा नंदी पुरस्कार पटकावला होता. याखेरीज त्यांनी 'अथडू', 'जलसा', 'खलेजा', 'जुलई', 'सन आॅफ सत्यमूर्ती', 'अ... आ', 'अज्ञातवासी' यांसारख्या काही गाजलेल्या चित्रपटांचंही दिग्दर्शन केलं आहे. सध्या ते अल्लू अर्जुनसोबत आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. या चित्रपटात अल्लू अर्जुनच्या आईच्या भूमिकेत तब्बू आहे. त्रिविक्रम यांनी लिहिलेल्या त्या चित्रपटाबाबत सुनीलकडून समजल्यानंतर २००० कोटींचं बजेट असलेल्या चित्रपटाची उत्सुकता सर्वांना लागली आहे.


हेही वाचा  -

आमिर गाजवणार पुढल्या वर्षीचा ख्रिसमस!

नागरिकत्वावर अखेर अक्षयनं तोडली चुप्पी


पुढील बातमी
इतर बातम्या