रणबीर बनला सुपरपॅावर असलेला डीजे!

आपण कोणत्याही प्रकारची भूमिका उत्तम प्रकारे साकारू शकतो हे अभिनेता रणबीर कपूरनं 'संजू' या चित्रपटात संजय दत्तची भूमिका यशस्वीपणे सादर करत सिद्ध केलं आहे. आजवर नेहमीच विविधांगी व्यक्तिरेखा साकारणारा रणबीर आता सुपरपॅावर असलेला डीजे बनला आहे.

लक्षवेधी चित्रपटांपैकी एक

'ब्रम्हास्त्र' हा चित्रपट यंदाच्या लक्षवेधी चित्रपटांपैकी एक आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन आयान मुखर्जी करत आहे. या चित्रपटात रणबीरसोबत आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळं सर्वांनाच या चित्रपटाबाबत जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा लोगो महाकुंभ २०१९ मध्ये प्रयागराज येथे १५० द्रोणच्या सहाय्यानं लाँच करण्यात आला होता. यंदा २० डिसेंबरला रिलीज होणाऱ्या या चित्रपटातील काही गोष्टी हळूहळू बाहेर येऊ लागल्या आहेत.

सुपरपॅावर्सची जाणीव

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रणबीर या चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांना भेटणार आहे. यापूर्वी गायकाच्या भूमिकेत दिसलेला रणबीर 'ब्रम्हास्त्र'साठी डीजे बनला आहे. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी तो वडिलांच्या इच्छेविरुद्ध वागत घरातून पळून जातो. या प्रवासात त्याला आपल्या आत दडलेल्या सुपरपॅावर्सची जाणीव होते. आपल्या तळहातामध्ये आग विझवण्याची शक्ती असल्याची प्रचिती त्याला येते. या चित्रपटासाठी रणबीरनं विशेष प्रकारच्या ट्रेनिंगसोबतच ट्रेडिशनल इंडियन मार्शल आर्टसचंही प्रशिक्षण घेतलं आहे. यात कलारीपयट्टू आणि वर्मा कलाई यांचा समावेश आहे. सर्व प्रशिक्षण पूर्ण केल्यावरच २०१७ मध्ये रणबीरनं शूटिंगला सुरुवात केली.

शिवा नावाची व्यक्तिरेखा

या चित्रपटात रणबीरनं शिवा नावाची व्यक्तिरेखा साकारली असून, इशाची भूमिका आलियानं वठवली आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांना आॅनस्क्रीन रणबीर-आलियाची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन, डिंपल कपाडीया, मौनी राॅय, नागर्जुन आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. या फँटसी फिल्मचं लेखनही आयान मुखर्जीनंच केलं आहे.


हेही वाचा -

मोदींविरोधात प्रचारासाठी 'बीएसई'च्या इमारतीचा मॉर्फ फोटोचा वापर

डोंबिवलीतील केमिकल कंपनीला आग


पुढील बातमी
इतर बातम्या