श्रीदेवी यांचा 'शिद्दत' चुकला, 'झिरो' ठरला शेवटचा चित्रपट

अभिनेत्री श्रीदेवी यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने झालेलं अकस्मिक निधन हजारो, लाखो चाहत्यांच्या काळजाला चटका लावून गेलं. श्रीदेवी यांच्या जाण्यामुळे एक चांगली व्यक्ती, अभिनेत्री, मैत्रीण, सहकारी गमावल्याच्या प्रतिक्रिया अनेक सेलिब्रिटिंकडून व्यक्त केल्या जात आहेत.

इंग्लिश-विंग्लिशमधून केलं होतं 'कमबॅक'!

२०१२मध्ये गौरी शिंदे यांच्या इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातून श्रीदेवी यांनी मोठ्या काळानंतर कमबॅक केलं होतं. एका सामान्य गृहिणीची भूमिका साकारून श्रीदेवी यांनी सर्वच चाहत्यांचं मन जिंकलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा मॉम चित्रपटात त्यांनी अशीच एक सक्षम भूमिका निभावली.

आलिया भट्टसोबत साकारली असती भूमिका

मात्र, त्यांच्या नवीन चित्रपटाची सर्व चाहत्यांना प्रतिक्षा होती. करण जोहर शिद्दत या चित्रपटाची निर्मिती करत असून आयएमडीबीवर आलेल्या माहितीनुसार आलिया भट्ट, वरूण धवन आणि संजय दत्त यांच्यासोबतच शिद्दतमध्ये श्रीदेवी यांनाही कास्ट करण्यात आलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक वर्मन करत असून पुढच्या एक किंवा दोन महिन्यात त्याचं शुटिंगही सुरू होण्याची शक्यता होती.

'झिरो'तली भूमिका शेवटीची ठरली

शिद्दतमधली श्रीदेवी यांची भूमिका जरी आता प्रेक्षकांना पाहाता येणार नसली, तरी झिरो हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला आहे. शाहरूख खानची प्रमुख भूमिका असलेल्या झिरोमध्ये श्रीदेवी यांनी कॅमिओ रोल केला आहे.

श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर हीसुद्धा धर्मा प्रॉडक्शनच्या धडक सिनेमातून पदार्पण करत असून येत्या जुलै महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सध्या या सिनेमाचं शुटिंग सुरू आहे.


हेही वाचा

श्रीदेवी दुबईत पडल्या, तेव्हा नक्की काय झालं?

पुढील बातमी
इतर बातम्या