‘अदानी’ने ‘एफपीओ’ गुंडाळला, गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचा निर्णय

अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी एंटरप्रायझेसने ‘फॉलो-ऑन समभाग विक्री’ अर्थात ‘एफपीओ’ प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. बोली लावलेल्या गुंतवणूकदारांना पैसे परत करणार असल्याचे कंपनीने जाहीर केले.

‘एफपीओ’च्या माध्यमातून देशाच्या भांडवली बाजाराच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी २०,००० कोटी रुपये उभे करणारी ही समभाग विक्री प्रतिकूल बाजारस्थितीतही मार्गी लावण्यात मंगळवारी कंपनीला यश आले होते. बुधवारी सायंकाळी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ‘एफपीओ’ गुंडाळत असल्याचा निर्णय घेण्यात आला. ‘‘अभूतपूर्व परिस्थिती आणि सध्याची बाजारातील अस्थिरता लक्षात घेता ‘एफपीओ’मधून मिळविलेला निधी परत करून, हा पूर्ण झालेला व्यवहार मागे घेत आहोत. या प्रक्रियेत सहभागी झालेल्या गुंतवणूकदार समुदायाच्या हितरक्षणाचे कंपनीचे यामागे उद्दिष्ट आहे,’’ असे कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

समभागाच्या किमतीतील अभूतपूर्व घसरगुंडीचा उल्लेख करून, अदानी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ‘‘या विलक्षण परिस्थितीत ‘एफपीओ’च्या प्रक्रियेत पुढे जाणे नैतिकदृष्टय़ा योग्य होणार नाही, असे संचालक मंडळाला वाटल्याचे नमूद केले.

समभाग घसरण सुरूच

हिंडेनबर्ग अहवालात करण्यात आलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागात बुधवारीही घसरण सुरू राहिली. अदानी एंटरप्रायझेस तब्बल २८ टक्क्यांहून अधिक तर, अदानी पोर्ट्स १९ टक्क्यांहून अधिक गडगडला. मागील पाच सत्रांमध्ये अदानी समूहाने तब्बल ७ लाख कोटी रुपयांहून अधिक बाजार भांडवल गमावले आहे.


हेही वाचा

मुंबईकरांना मोठा दिलासा, सीएनजीच्या दरात मोठी कपात

पुढील बातमी
इतर बातम्या