फेसबुकने केली रिलायन्स जिओत गुंतवणूक, डिजिटल मार्केटमधील सर्वात मोठी भागीदारी

सोशल मिडीया कंपनी फेसबुकने  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओमध्ये  ४३ हजार ५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. बुधवारी फेसबुकने जिओसोबत भागीदारी करत असल्याची घोषणा केली आहे. यानुसार फेसबुकने जिओमधील ९.९९ टक्के शेअर विकत घेतले आहेत. भारतीय टेक क्षेत्रातील ही सर्वात मोठी परकीय गुंतवणूक आहे.

या गुंतवणुकीमुळे मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुकला  भारतातील डिजिटल मार्केटमध्ये आपले पाय भक्कमपणे रोवता येणार आहेत. तर याचा मोठा फायदा जिओलाही होणार आहे.  फेसबुक आणि जिओमधील या करारामुळे जिओ अॅप्स प्लॅटफॉर्मचं मूल्य वाढून ४.६२ लाख कोटी रुपये होणार आहे. तर हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर फेसबुक रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक करणारी सर्वात मोठी शेअर होल्डर कंपनी ठरेल. फेसबुक आणि जिओ विविध प्रोजक्टवर एकत्रितपणे काम करणार आहे, ज्यामुळे देशभरात व्यवसायाच्या संधी निर्माण होतील, असं दोन्ही कंपन्यांनी म्हटलं आहे.

याबाबत रिलायन्स इंडस्ट्रीजकडून सांगण्यात आलं की, 'रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड, जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आणि फेसबुक यांच्यात एका गुंतवणूक करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये फेसबुककडून ४३ हजार ५७४ कोटी रुपये गुंतवणूक केली जाईल.' जिओ हा रिलायन्स इंडस्ट्रिजचाच एक भाग आहे. जिओने गेल्या काही वर्षात दूरसंचार क्षेत्रात एक नवीन वातावरण निर्माण केल्यानंतर ब्रॉडबँड आणि जिओ सेटटॉप बॉक्स आणून नव्या क्षेत्रातही पदार्पण केलं. शिवाय जिओ अॅप्सचाही व्यवसाय मोठा आहे. भारतीयांची सेवा करण्यासाठी आणि डिजीटल परिवर्तनासाठी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्यासोबत भागीदारी केली आहे, अशी प्रतिक्रिया मुकेश अंबानी यांनी दिली.

भारतात फेसबुक आणि त्याच्या मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपचं मोठं जाळं आहे. भारतात फेसबुकचे 400 मिलियन यूझर्स आहेत.  मार्क झुकरबर्ग म्हणाले की,  या करारामुळे भारताबद्दलची वचनबद्धता अधोरेखित होते. जिओ ने भारतात खूप मोठे बदल घडवले आहेत. त्यामुळे आम्ही देखील आकर्षित झालो. चार वर्षांहून कमी काळात रिलायन्स जिओने 388 मिलियनहून अधिक लोकांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणलं आहे. यामुळं जिओच्या माध्यमातून आम्ही भारतात पहिल्यापेक्षा अधिक लोकांशी कनेक्ट करण्यासाठी कटिबद्ध आहोत. या भागीदारीत जिओ प्लॅटफॉर्म, रिलायन्स रिटेल आणि व्हॉट्सअ‍ॅपवरही करार होणार आहे. या अंतर्गत रिलायन्स रिटेलच्या व्यवसायाला वेग देण्याचा करार होईल.


हेही वाचा -

मास्क न लावणाऱ्या १३३० जणांवर कारवाई

मुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट


पुढील बातमी
इतर बातम्या