देशात तिसरी मोठी बँक उदयाला येणार

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सोमवारी 'देना बँक', 'विजया बँक' आणि 'बँक ऑफ बडोदा' या देशातल्या तीन मोठ्या बँकांच्या विलिनीकरणाची घोषणा केली. या तिन्ही बँकांच्या विलिनीकरणानंतर जन्माला येणारी बँक ही देशातली तिसरी मोठी बँक असेल. विलिनीकरणाच्या प्रक्रियेत बँकेच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्यात येणार नाही, असंही जेटली यांनी स्पष्ट केलं.

कशासाठी विलिनीकरण?

सरकारी बँकांची वाढती थकित कर्जे (एनपीए) तसंच देशाच्या कानाकोपऱ्यात बँकिंग सेवा पोहोवण्यासाठी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने सार्वजनिक बँकांचं विलिनीकरण करण्याचं धोरण जाहीर केलं होतं. त्यानुसारच हे विलिनीकरण करण्यात येणार आहे.

आयएफएससी कोड बदलणार

याआधी स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ पतियाळा, स्टेट बँक ऑफ मैसूर आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद यांच्यासह भारतीय महिला बँकेचं स्टेट बँकेमध्ये विलिनीकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर स्टेट बँकेने जवळपास १३०० शाखांचे आयएफएससी कोड बदलले होते. त्यानुसार नव्या बँकेच्या शाखांचेही कोड बदलण्यात येतील.

फायदा काय?

'देना बँक', 'विजया बँक' आणि 'बँक ऑफ बडोदा' या तीन बँकांच्या विलिनीकरणातून उदयास येणारी नवी बँक आणखी सशक्त बनण्याबरोबरच, तिची पतपुरवठा क्षमताही वाढेल, असा विश्वास यावेळी अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला. सोबतच ग्राहकांची संख्या वाढणे, नेटवर्क विस्तार आणि कार्यक्षमतेत वाढ होईल, परिणामी ग्राहकांना अधिकाधिक प्राॅडक्ट्स अाणि चांगली सेवा देता येईल, असंही ते म्हणाले.

नोकरी कायम राहणार?

या तीन बँकांचं विलिनीकरण होणार असलं, तरी या तिन्ही बँकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुठलीही गदा येणार नसल्याचा खुलासा जेटली यांनी केला. विलिनीकरणानंतर जन्माला येणाऱ्या बँकेत सर्व कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यात येईल.


हेही वाचा-

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं


पुढील बातमी
इतर बातम्या