इलेक्ट्रिक उत्पादनांत प्रामुख्याने वापर होणाऱ्या तांब्याच्या किंमती बुधवारी एमसीएक्सवर उच्चांक पातळीवर पोहोचल्या आहेत. याचाच परिणाम फ्रिज, एसी, कूलर आणि पंख्यांसह विविध इलेक्ट्रिक उत्पादनांच्या किमतीवर होण्याची शक्यता आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर बुधवारी तांब्याची किंमत ६३८.५० प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. या धातूची ही अातापर्यंतची सर्वात जास्त किंमत आहे. वर्षभरापूर्वी याच अवधीत तांब्याची किंमत ४२० रु. प्रति किलो होती. म्हणजे, वर्षभरात किंमत ५० टक्के वाढली आहे.
उन्हाळ्यात विकणाऱ्या बहुतांश इलेक्ट्रिक उपकरणांची निर्मिती जानेवारीपासून मार्चदरम्यान होते. एसी आणि फ्रिज दोन्हींत तांब्याच्या ट्यूबचा वापर होतो. या ट्यूबच्या माध्यमातून रेफ्रिजरेंट प्रवाहित होतो. याच पद्धतीनं पंख्याच्या कॉइलमध्ये तांबे वापरले जाते. कूलरचे पंखे अणि हनीकोम्ब नेटमध्येही तांब्याचा वापर होतो. याशिवाय विजेच्या तारांमध्येही तांब्याचा वापर होतो.
एंजेल ब्रोकिंगचे एव्हीपी रिसर्च अनुज गुप्ता म्हणाले, उन्हाळ्यातील उपकरणे उदा. फ्रिज, एसी, कूलर, पंखे आदी हिवाळ्यात तयार होतात. तांब्याच्या वाढत्या किमतीचा परिणाम उपकरणांच्या किमतीवरही पडेल. आगामी काळात तांब्याच्या किमती ७०० ते ७५० रु.च्या पातळीवर पोहोचेल.
हेही वाचा