कोरोनामुळे भारतीय बाजारपेठ आजारी; टिव्ही, फ्रिज आणि मोबाइल महागणार

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चीनमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. ज्यामुळे तिथल्या उद्योगावर परिणाम होऊ लागला आहे. चीनमधल्या बऱ्याच शहरांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचे प्लांट काही दिवसांपासून बंद आहेत. यामुळे जागतिक स्तरावर पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. अशा परिस्थितीत कोरोनामुळे जगातील बऱ्याच देशांच्या उद्योगावर परिणाम होऊ लागला आहे.

तज्ज्ञांचं मत आहे की, जर अशाच प्रकारे पुरवठा साखळी विस्कळीत झाली तर देशातील उद्योगावर मोठा परिणाम होऊ शकतो. यामुळे येत्या काही दिवसांत टीव्ही, एसी, फ्रिज आणि मोबाईलच्या किंमती वाढू शकतात, असा अंदाजही वर्तवला जात आहे.

कोरोनामुळे इलेक्रटिक वस्तू महागल्या

भारतात कंपन्या एखादं उत्पादन तयार करण्यासाठी लागणारा माल चीनकडून आयात करतात. पण चीनमध्ये उत्पादन थांबल्यामुळे आपल्याला आवश्यक असणारा माल आयात होत नाही. अशा परिस्थितीत कंपन्यांची उत्पादन क्षमता घटत आहे. ब्रोकरेज हाऊस एमके ग्लोबलच्या मते, व्होल्टास, एलजी, डाईकिन यासारख्या बड्या कंपन्यांची उत्पादन क्षमता चांगली आहे. परंतु बऱ्याच लहान आणि मध्यम कंपन्यांची उत्पादन क्षमता ही चांगली नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या उत्पादन यादीवर परिणाम होत आहे. जर परिस्थिती अशीच राहिली, तर त्या कंपन्यांनाही उत्पादन कमी करावं लागेल, ज्यामुळे किंमतींमध्ये वाढ होऊ शकते.

परिस्थिती नियंत्रणात

एलजी इंडिया होम अप्लायन्सेसचे उपाध्यक्ष विजय बाबू म्हणतात की, आतापर्यंत परिस्थिती नियंत्रणात आहे. उत्पादन मागणीनुसार ग्राहकांपर्यंत वेळेत पोहोचवलं जातंय. त्यात काही उशीर होत नाही आहे. कोरोनामुळे चीनमध्ये उद्धभवलेल्या परिस्थितीवर आमचं लक्ष आहे. कंपनीच्या अन्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, उत्पादन तयार करण्यासाठी लागणाऱ्या दुसऱ्या देशातून आयात होणाऱ्या मालावर आपण जवळपास १५ टक्केच निर्भर आहोत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे.

एलईडी बल्ब महागले

कोरोनाचे दुष्परिणाम आता भारतात दिसून येऊ लागले आहेत. भारतात एलईडी बल्ब आणि दिवे १० टक्क्यांनी वाढणार आहेत. इलेक्ट्रिक लॅम्प अँड कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ईलकॉमा) इंडिया म्हणते की, चीनमधील बंदमुळे विद्युत घटकांच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. इलकोमाचे उपाध्यक्ष सुमित पद्माकर जोशी यांच्या म्हणण्यानुसार इलेक्ट्रॉनिक घटक, विशेषत: चिप यांची मोठ्या प्रमाणात कमतरता निर्माण झाली आहे. या चीप्स चिनी विक्रेत्यांकडून आयात केल्या जातात. यामुळे बल्बच्या किंमती ८ ते १० टक्क्यांनी वाढू शकतात.

मोबाईलच्या उत्पादनावरही परिणाम

अलीकडेच आयफोन बनवणारी कंपनी अॅपलनं म्हटलं आहे की, कोरोनामुळे जगभरात आयफोनचा पुरवठा खंडित होईल. चीनमधील कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागणाऱ्या मालाची आयात कमी झाली आहे. उत्पादन कमी झाल्यामुळे कंपनीचा फायनान्सर चालू तिमाहीत कमकुवत राहू शकतो. भारतातील कंपन्यादेखील चीनकडून बऱ्याच महत्त्वाच्या सामानाची आयात करतात. अशा परिस्थितीत भारतातील मोबाईल उत्पादनावरही परिणाम होऊ शकतो.


हेही वाचा

कोरोना व्हायरसमुळे राजमाच्या किंमतीत वाढ, आयात-निर्यातीवरही परिणाम

१ एप्रिलपासून होणार BS-6 पेट्रोल-डिझेलची विक्री

पुढील बातमी
इतर बातम्या