१३ वर्षीय मुलानं तयार केलं कुरियर अॅप

  • मुंबई लाइव्ह टीम & अतुल चव्हाण
  • व्यवसाय

आज सर्वच क्षेत्रात डिजिटलायजेशन होत असताना कुरियर सेवेचं रूपही दिवसेंदिवस बदलत चाललं आहे. एखादं कुरियर करण्यासाठी १५० ते २०० रुपये खर्च होतो. आणि ते त्याच्या  पोहचण्यासाठी कमीत कमी २ ते ३ दिवस लागतात. मात्र, एक स्वस्त आणि जलद कुरीयर सेवा देण्यासाठी मुंबईच्या १३ वर्षीय तिलक मेहताने पेपर अँड पार्सल नावाचं मोबाइल आधारित कुरियर अॅप तयार केलं आहे. तिलकच्या या अॅपच्या माध्यमातून केवळ ४० ते ५० रुपयात त्याच दिवशी ते कुरियर त्याच्या पत्त्यावर पोहचणार आहे. यामध्ये त्याला मुंबईच्या डबेवाल्यांचीसुद्धा साथ लाभली आहे.

अशी सुचली कल्पना

तिलक आपल्या काकांकडे आपली पुस्तकं विसरला होता. ती त्याने कुरियरच्या माध्यमातून परत मागवली. मात्र, त्याला बराच खर्च आला. त्यावेळी त्याला या अॅपची कल्पना सुचली, आपणही असं एखादं अॅप्लिकेशन तयार करू शकतो ज्यामुळे कमी पैशात आणि जलद गतीने कुरियर सेवा देता येईल. म्हणून प्रायोगिक तत्वावर त्याने मुंबईच्या डबेवाल्यांना निवडून पेपर्स अँड पार्सल च्या माध्यमातून कुरियर सेवा देण्याचं निश्चित केलं. या अॅपमार्फत कुरीयरने त्याच दिवशी पार्सल मिळणार अाहे.

कोण आहे तिलक मेहता?

तिलक विशाल मेहता हा मुंबईचा रहिवासी असून केवळ १३ वर्षाचा आहे. सध्या तो आयबी बोर्ड इंटरनॅशनल गरोडीया स्कूल या शाळेत ८ व्या वर्गात शिकत आहे. अतिशय शांत स्वभावाचा असा हा मुलगा असून, इतरांच्या मदतीसाठी नेहमी तयार असतो. घरातही त्याचं वागणं खूप समजूतदारपणाचं असतं. आमच्या सर्व परिवाराला तिलकवर खूप गर्व आहे,  अशी माहिती तिलकच्या आजी मधू पंकज मेहता यांनी दिली.

डबेवाले हे मुंबईचे खरे जाणकार आहेत. डबे पोहचवण्याचे काम संपल्यानंतर त्यांचा दुपारचा वेळ रिकामा असतो. या वेळेचा उपयोग करुन ते कुरीयरची सेवा देण्याचं काम करु शकतात. यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळेल. आणि म्हणूनच आम्ही या कामासाठी सुरुवतीला डबेवाल्यांची निवड केली. मला या अॅपसाठी माझ्या वडिलांकडून प्रेरणा मिळाली अाहे. भविष्यात मुंबई व्यतिरिक्त दिल्ली आणि इतर मेट्रो शहरांमध्ये सुद्धा अशा पद्धतीची सेवा सुरू करण्याचा आमचा विचार आहे.

- तिलक मेहता, संस्थापक, पेपर्स अँड पार्सल

सध्या ३०० डबेवाले यांच्याशी जो़डलेले अाहेत. यामुळे डबेवाल्यांची मोठी मदत झाली आहे. मात्र डबेवाला संघटना यांच्याशी जुळलेली नाही. कारण यांसोबत काम करणं हा पूर्णतः ऐच्छिक विषय आहे. एखादं पाकीट, किंवा पार्सल पोहचवणं हे फार कष्टाचं काम नाही. ज्या डबेवाल्यांना इच्छा असेल ते यांच्यासोबत काम करू शकतात. यामुळे डबेवाल्यांच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होऊ शकते.

- सुभाष तळेकर, अध्यक्ष,  डबेवाला संघटना


हेही वाचा -

डिमांड ड्राफ्टवर अाता पैसे देणाऱ्याचंही नाव, अारबीअायचा निर्णय


 

पुढील बातमी
इतर बातम्या