PMC Scam: रिझर्व्ह बँकेसमोर खातेदारांचं ठिय्या आंदोलन

रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) बँकेवरील निर्बंध सहा महिन्यांसाठी वाढवले आहेत. यामुळे बँकेचे खातेदार संतप्त झाले आहेत. आरबीआयच्या या निर्णयाविरोधात खातेदारांनी बुधवारी रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं.

कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यामुळे आरबीआयने पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध घातले आहे. खातेदारांना पैसे काढण्यावरही मर्यादा घातली आहे. लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. नुकताच रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवरील आर्थिक निर्बंध सहा महिन्यांसाठी  २२ डिसेंबरपर्यंत  वाढवले आहेत. मात्र त्यात पैसे काढण्याची मर्यादा १ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी खातेदारांना बँकेतून ५० हजार रुपये काढण्याची परवानगी होती.

पीएमसी बँकेने एचडीआयएल या कंपनीला कर्ज दिले होते. या कर्जाची परतफेड न झाल्यानेच बँकेत ६५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला. या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार वाधवान पितापुत्राने पीएमसी बँकेतील अधिकाऱ्यांशी संगनमत साधून आपल्या एचडीआयएल कंपनीची ४४ थकित कर्जे बनावट खात्यांवर दाखवली. नुकताच त्यांचा जामीन फेटाळण्यात आला होता. आर्थर रोड तुरुंगात करोनाचा संसर्ग वाढत आहे आणि आम्ही अनेक आजारांनी ग्रस्त असल्याने आम्हाला अधिक धोका आहे', असे कारण देत  मुख्य आरोपी असलेले राकेश व सारंग वाधवान यांनी अंतरिम जामिनासाठी केलेले अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळून लावला होता.


हेही वाचा -

G South पालिकेच्या कार्यालयात 'अशी' घेतली जातेय कर्मचाऱ्यांची काळजी

३० मिनिटात कोरोनाचं निदान, पालिकेचं 'मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग'


पुढील बातमी
इतर बातम्या