४९ वर्षांनंतर महिला अर्थमंत्री सादर करणार अर्थसंकल्प

अर्थमंत्री निर्मला सीतारमण ५ जुलैला संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील.या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे तब्बल ४९ वर्षांनंतर महिला अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या आधी १९७० मध्ये इंदिरा गांधी यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. इंदिरा गांधी यांनी अर्थमंत्री म्हणून २८ फेब्रुवारी १९७० या दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत मांडला होता. आता निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणाऱ्या दुसऱ्या महिला ठरणार आहेत. 

अर्थसंकल्पाविषयी रंजक माहिती

  • ब्रिटिश व्हाईसराॅयच्या वित्तीय समितीचे सदस्य जेम्स विल्सन  यांनी १८ फेब्रुवारी १८६० रोजी व्हाईसराॅयच्या परिषदेत भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. विल्सन यांच्याकडं भारताची नवीन कर संरचना आणि त्याचबरोबर नवीन कागदी चलनाच्या स्थापनेचं काम सोपवण्यात आलं होतं. विल्सन यांच्याबद्दल महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांनी साप्ताहिक पत्रिका द इकाॅनॉमिस्टची स्थापना केली होती.  
  • आरके षणमुखम चेट्टी हे स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते. त्यांनी २६ नोव्हेंबर १९४७ रोजी देशाचा पहिला अर्थसंकल्प मांडला.  
  • ब्रिटीशकाळापासून वर्ष २००० पर्यंत फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता अर्थसंकल्प सादर केला जात होता. २००१ मध्ये अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी या प्रथेत बदल केला. यावर्षीपासून अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता संसदेत मांडण्यास सुरूवात झाली.अर्थसंकल्प सादर करण्यास सायंकाळी ५ वाजताच्या वेळेस पसंती दिली जात होती. कारण ब्रिटिश संसदेसाठी ही वेळ सोयीस्कर होती. 
  • सर्वात लांबलचक अर्थसंकल्पीय भाषण अर्थमंत्री अरूण जेटली यांनी २०१४ मध्ये दिलं होतं. अडीच तास हे भाषण चाललं होतं.यामध्ये ५ मिनिटांचा ब्रेक होता. 
  • मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक १० वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये ८ वेळा पुर्ण अर्थसंकल्प आणि २ वेळा अंतरिम अर्थसंकल्प होते. देसाई यांनी १९५९ ते १९६३ पर्यंत दरवर्षी अर्थसंकल्प सादर केला. १९६७ ते १९६९ पर्यंत त्यांचा दुसरा कार्यकाळ राहिला. 
  • अर्थसंकल्प तयार झाल्यावर छपाईला जाण्याआधी अर्थमंत्रालयात एक कार्यक्रम आयोजीत केला जातो. याला हलवा कार्यक्रम म्हणतात. यावेळी हलवा बनवून अर्थमंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना वाटला जातो. त्यानंतर अर्थसंकल्पाच्या छपाईला सुरूवात होते. 
  • प्रत्येक अर्थसंकल्प महत्त्वाचा असतो. मात्र, काही अर्थसंकल्पाची नोंद इतिहासात झाली आहे. यामधील एक २४ जुलै १९९१ ला तत्कालीन अर्थमंत्री  मनमोहन सिंह यांनी सादर केलेला अर्थसंकल्प आहे. या  अर्थसंकल्पाने भारताची अर्थव्यवस्था उदार केली. आणि येथूनच आर्थिक सुधारणांचे एेतिहासिक पर्व सुरू झाले.


हेही वाचा -

कंपनीचं मुख्यालय विकून अनिल अंबानी फेडणार कर्ज?

नोकरदारांना फटका, PPF, NSC चे व्याजदर घटले


पुढील बातमी
इतर बातम्या