केईएममध्ये नोंदीसाठी 10 नवी केंद्र

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

केईएम रुग्णालयात येत्या 15 दिवसात रुग्णांच्या नोंदीसाठी दहा नवी केंद्र उभारली जाणार आहेत. तसेच खाजगी एमआरआय ही पालिका दरानुसार करण्यासाठी निविदा काढली जाणार आहे. त्यामुळे रुग्णांचा पैसा आणि वेळ ही वाचणार आहे.

पुढच्या सात दिवसात खाजगी एमआरआय केंद्रासाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिली. तसेच केईएममध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात दक्षता समिती स्थापन करण्यात येणार आहे. यात नागरिकांचा ही समावेश करण्यात येणार आहे. दक्षता समिती रुग्णांच्या अडचणी सोडवून त्यांना सुविधा देण्यात मदत करेल. 

के.ई.एम. रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय, अपुऱ्या सुविधा, नागरिकांच्या सूचना आणि उपाययोजनांबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम यांची पालिका मुख्यालयात संयुक्त आढावा बैठक झाली. या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येत्या 15 दिवसात रुग्ण सेवा सुधारण्याचे आश्वासन दिले आहे. 

केईएममध्ये होत असलेली नागरिकांची गैरसोय, आणि खाजगी चाचण्यांमुळे रुग्णांची लूट पाहून मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

यासंदर्भात मंत्री लोढा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रुग्णांच्या अनेक तक्रारींचा विचार करण्यात आला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा, उपायुक्त  शरद उघडे, वैद्यकीय संचालक डॉ. नीलम अंद्राडे, केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, भाजप दक्षिण मुंबई अध्यक्षा  शलाका साळवी आणि पदाधिकारी सतीश तिवारी उपस्थित होते.

या बैठकीत औषधांच्या टंचाई बाबतही चर्चा करण्यात आली. यावर मंत्री लोढा आणि भाजप मुंबई अध्यक्ष साटम यांनी अधिकाऱ्यांना पुन्हा धारेवर धरले. या चर्चेदरम्यान पुढील दोन वर्ष आवश्यक औषधांचा साठा करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यांनतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर स्टॉक करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

अनेक नागरिकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून के.ई.एम एमआरआय मशीन नादुरुस्त असल्याची तक्रार केली होती. तब्बल सहा सहा महिने एमआरआयसाठी तारीख मिळत नसल्याचेही रुग्णांनी सांगितले होते.

यावर मार्ग काढण्यासाठी जोपर्यंत केईएम मधील एमआरआय मशीन दुरुस्त होऊन व्यवस्था सुरळीत होत नाही, तो पर्यंत खाजगी केंद्रात पाठवण्यात येणाऱ्या रुग्णांकडून महापालिकेच्या दरानुसारच एमआरआय चाचणीची आकारणी करावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली. 


हेही वाचा

रुग्णवाहिकांवर दर यादी लावण्याचे आदेश

पुढील बातमी
इतर बातम्या