कांदिवलीत सोळा वर्षाच्या मुलाचा लेप्टोने मृत्यू

दूषित पाण्यातून संसर्ग होऊन लेप्टोस्पायरोसिसची लागण झाल्यामुळे मुंबईत आणखी एकाचा बळी गेला आहे. कांदिवलीत राहणाऱ्या तन्मय कमलेश प्राज्ञे या 16 वर्षाच्या तरुणाला लेप्टोमुळे आपला जीव गमवावा लागलाय. 

तन्मय प्राज्ञे हा मूळचा दापोली तालुक्यात राहणारा आहे. त्याचे वडील एका हिऱ्याच्या कंपनीत हिरे पॉलिश करायचं काम करतात. तन्मय हा त्यांचा मोठा मुलगा होता. दहावीत त्याला ७० टक्के गुण मिळाले होते. त्याला वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यायची इच्छा होती. अखेर गोरेगाव येथील पाटकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेत त्याला प्रवेशही मिळाला. या महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याने खूश असलेला तन्मय आपल्या मित्रांसोबत तलावात पोहायला गेला. मात्र त्या तलावाच्या पाण्यात नाल्याचं पाणी मिसळल्यानं तो आजारी पडला.

उपचारादरम्यान मृत्यू

२४ जुलै रोजी त्याला अमर रुग्णालयात उपचारासाठी नेले असता मेडिकल रिपोर्टमध्ये त्याला लेप्टोची लागण झाल्याचं समजलं, परंतु त्या रुग्णालयात लेप्टोच्या उपचारासाठी लागणारं उपकरण नसल्यानं २५ जुलै रोजी त्याला त्वरित मालाड येथील रिद्धीविनायक मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तन्मय कोमामध्ये गेला. तो कोणत्याही उपचाराला प्रतिसाद देत नव्हता. अखेर २८ जुलै पहाटे ४ वाजून १३ मिनिटांनी तन्मयचा मृत्यू झाला.

तन्मयच्या मृत्यूने कांदिवली गावात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेनंतर कांदिवली तलाव साफ व्हावं ही विनंती तिथल्या स्थानिकांनी केली आहे.

तन्मयला २४ जुलैला रिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर वैद्यकीय अहवालात त्याला लेप्टो झाल्याचं आढळून आलं. त्यानुसार त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र दोन दिवस झाले तरी तो उपचाराला प्रतिसाद देत नव्हता. त्यानंतर तो कोमात गेला. त्याचं लिव्हर आणि शरीरातील इतर अवयव निकामी झाले होते. त्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. मात्र काहीही प्रतिसाद देत नसल्याने कुटुंबियांनी त्याला व्हेंटिलेटवरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.

- डॉ. गोयल, रिद्धिविनायक हॉस्पिटल, मालाड


हेही वाचा -

मुंबईत लेप्टोचा सहावा बळी

पुढील बातमी
इतर बातम्या