बिल्डरविरोधातील तक्रारींचं निवारण बिल्डरच करणार? 'महारेरा'च्या सामंजस्य कक्षात ३३ पैकी १८ बिल्डर

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बिल्डरांविरोधातील तक्रारींचं झटपट निवारण व्हावं, ग्राहकांचा वेळ वाचावा यासाठी 'महारेरा'ने सामंजस्य कक्षाची स्थापना केली आहे. बिल्डर आणि ग्राहक पंचायतीच्या एकूण ३३ सदस्यांचा समावेश असलेला हा कक्ष लवकरच कामकाजाला सुरूवात करणार आहे. पण कामकाज सुरू होण्याअगोदरच हा कक्ष वादात अडकण्याची शक्यता आहे. यामागचं कारण म्हणजे या कक्षातील ३३ सदस्यांपैकी ५५ टक्के अर्थात १८ सदस्य हे बिल्डरच आहेत. या पार्श्वभूमीवर बिल्डरांविरोधातील तक्रारींचं बिल्डर कसं निवारण करणार? ग्राहकांना न्याय मिळणार का? की बिल्डर मांडवली करणार? असे एक ना अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

म्हणून सामंजस्य कक्षाची स्थापना

मे २०१७ पासून बिल्डरांविरोधातील तक्रारींचं निवारण महारेराच्या माध्यातून करण्यात येत आहे. महारेराचं कामकाज सुरू झाल्यापासून बिल्डरांच्या तक्रारींचा ओघ महारेराकडे वाढत चालला आहे. मुंबईसह राज्यभरातून तक्रारी येत असल्याने तक्रारींचे निवारण करण्यास विलंब होत आहे. तर महारेरावरही ताण वाढत आहे, म्हणून महारेराने रेरा कायद्यातील तरतुदीनुसार सामंजस्य कक्ष स्थापन केल्याची माहिती महारेराचे सचिव वसंत प्रभू यांनी दिली.

तरच महारेराकडे धाव

महारेराकडे येण्याआधी ग्राहकांना या सामंजस्य कक्षाकडे तक्रार करावी लागणार आहे. बिल्डर संघटनांच्या आणि ग्राहक पंचायतीच्या सदस्यांचा समावेश असलेल्या या कक्षाद्वारे ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण केलं जाणार आहे. तर तक्रारदार अर्थात ग्राहक आणि ज्याच्याविरोधात तक्रार आहे असा बिल्डर या दोघांपैकी कुणालाही सामंजस्य कक्षाचा निर्णय मान्य नसेल, तर मग महारेराकडे धाव घेता येणार आहे.

ज्याच्याविरोधात तक्रार 'तो'ही कक्षात

महारेराने जाहीर केल्यानुसार सामंजस्य कक्षात ५० टक्के बिल्डर प्रतिनिधी तर ५० टक्के ग्राहक पंचायतीचे प्रतिनिधी असणार होते. पण प्रत्यक्षात मात्र ग्राहक पंचायतीचे प्रतिनिधी ४५ टक्के असून बिल्डरांची टक्केवारी मात्र ५५ टक्के अशी आहे. म्हणजेच ३३ सदस्यांपैकी १८ सदस्य बिल्डर असून १५ ग्राहक पंचायतीचे सदस्य आहेत. त्यातही महत्त्वाचं ज्या बिल्डरविरोधात महारेराकडे फसवणुकीची तक्रार आली होती, ज्या बिल्डरच्याविरोधात महारेराने निर्णय दिला होता, 'त्या' बिल्डरचाही या कक्षात समावेश आहे. त्यामुळे ग्राहकांना न्याय कसा मिळेल, यावरच शंका उपस्थित केली जात असून अशा कक्षाची गरज आहे का? असाही सवाल आता होऊ लागला आहे.

सामंजस्य कक्ष की मांडवली कक्ष?

या कक्षाची स्थापना चांगल्या हेतूने करण्यात आली, पण हा कक्ष कितपत यशस्वी ठरतो याबद्दल शंका आहे. कारण या कक्षात बिल्डर असल्यानं दुसऱ्या बिल्डरांच्या विरोधात कक्षातील बिल्डर जातील का? हा मोठा प्रश्न आहे. तर कक्षातील बिल्डरांचा कल हा माडंवली करण्याकडेच राहिल अशीही शक्यता आहे.

- रमेश प्रभू, अध्यक्ष, महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशन


हेही वाचा-

दाद मागायची सोय, महसूल न्यायाधिकरण होणार महारेराचं अपिलीय न्यायाधिकरण


पुढील बातमी
इतर बातम्या