धक्काबुक्कीशिवाय मेट्रो प्रवास करता यावा म्हणून महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमएमएमओसीएल) ताफ्यात तीन नव्या कोऱ्या मेट्रो ट्रेन दाखल करण्यात आल्या आहेत. या सुविधेमुळे अंधेरी-दहिसर-गुंदवली मार्गावर आजपासून गर्दीच्या वेळी 21 फेऱ्या वाढणार आहेत. तीन लाखांहून अधिक मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गारेगार आणि वाहतूक कोंडीमुक्त प्रवासाकडे मुंबईकरांचा मेट्रोने प्रवास करण्याकडे कल आहे. यामुळेचे मेट्रो 2 आणि 7 या मार्गावरील प्रवासी संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. प्रवासाचा हाच अनुभव अधिक सुलभ आणि कार्यक्षम करण्याच्या दिशेने एमएमआरडीएने मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्यास मंजुरी दिली आहे.
त्यानुसार तीन नव्या मेट्रो गाड्या सेवेत दाखल झाल्या असून, बुधवारपासून 305 फेऱ्या होणार आहेत. तसेच अतिरिक्त 21 वाढीव फेऱ्यांसाठी तीन नवीन ट्रेन तैनात केल्याने कार्यरत ट्रेनची संख्यादेखील आता 21 वरून 24 झाली आहे.
गर्दीच्या वेळांमध्ये मेट्रो येण्याचा वेळ आता 6 मिनिटे 35 सेकंदांवरून 5 मिनिटे 50 सेकंदांवर आणण्यात आला आहे. यामुळे फलाटांवरील गर्दी कमी होणार असून, प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी कमी होणार आहे. गर्दीच्या वेळा नसताना फेऱ्यांच्या वारंवारतेमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्या फेऱ्या पूर्वीप्रमाणे 9 मिनिटे 30 सेकंदांच्या अंतरानेच सुरू राहणार आहेत.
हेही वाचा