२०० खड्ड्यांकडं पालिकेचं दुर्लक्ष

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

खड्डे दाखवा, ५०० रुपये मिळवा या मुंबई महापालिकेच्या योजनेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पालिकेच्या अ‍ॅपवरून नागरिकांनी खड्ड्यांच्या १ हजार तक्रारी केल्या आहेत. मात्र, यामधील २०० खड्डे बुजवण्यातच आलेले नाहीत. या खड्ड्यांकडं पालिकेने दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे. तसंच या खड्ड्यांच्या तक्रारी करणाऱ्या तक्रारदारांना ५०० रुपये बक्षिसाचीही प्रतीक्षा आहे.

 खड्डे दाखवा आणि ५०० रुपयांचे बक्षीस मिळवा, अशी योजना  मुंबई महापालिकेने १ नोव्हेंबरपासून लागू केली आहे. यामध्ये खड्डे दिसल्यास त्याची तक्रार अ‍ॅपवर करायची आहे. त्यानंतर पालिकेने हा खड्डा २४ तासात न बुजवल्यास तक्रारदाराला ५०० रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. या योजनेत २ नोव्हेंबपर्यंत ६९५ तक्रारी आल्या होत्या. मात्र, यापैकी फक्त ३४० खड्डे बुजवण्यात आले. काही ठिकाणी ४८ तास उलटले तरीही खड्डे बुजवले नसल्याचं तक्रारदारांनी सांगितलं आहे. त्यानंतर खड्ड्यांच्या तक्रारी आणखी वाढल्या आहेत. नागरिकांनी तक्रार केलेल्या १ हजार खड्ड्यांपैकी २० खड्डे बुजवले गले नाहीत. 

‘पॉटहोल वॉरियर्स’ या संस्थेचे मुश्ताक अन्सारी यांनी १ तारखेपासून पाच खड्डय़ांच्या तक्रारी केल्या आहेत. त्यापैकी केवळ दोनच खड्डे बुजवले गेले असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, पालिकेच्या या योजनेबाबत अभियंत्यांमध्ये नाराजी आहे. पालिकेने कोणतेही परिपत्रक काढून या योजनेची माहिती दिली नाही, असं अभियंत्यांनी म्हटलं आहे. शनिवारी एखादी तक्रार आली तर तो खड्डा बुजवण्यासाठी रविवारी कर्मचारी उपलब्ध नसतात, असं एका अभियंत्याने सांगितलं. 


हेही वाचा  -

मेट्रो ३ प्रकल्पाच्या ३२ भुयारी टप्प्यांपैकी २२ पूर्ण


पुढील बातमी
इतर बातम्या