आॅगस्ट १ ते १० तारखेदरम्यान राज्यात लसीचा ३० टक्के तुटवडा!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

एका बाजूला कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचं मिरवलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला अपुऱ्या लसींअभावी लसीकरण मोहिमेला वारंवार खिळ बसत असल्याचंही पुढं येत आहे. १ ऑगस्ट ते १० ऑगस्टपर्यंत राज्यातील लसीकरणात ३० टक्के घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाची तिसरी लाट उंठरठ्यावर आलेली असताना लसीकरणातील संथगती धोक्याची ठरण्याची शक्यता आहे. 

जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात लसीकरणाने चांगलाच वेग धरला होता. कोरोनाची (coronavirus) तिसरी लाट थोपविण्यासाठी कोरोना प्रतिबंध नियमांचं काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. जागतिक स्तरावर ज्या देशांमध्ये लसीकरण जास्त झाले तिथं तिसरी लाट आली तरी तिचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राज्यामध्ये अधिकाधिक लसीकरण करण्यावर भर देण्यात येत असून अखंडितपणे लस पुरवठ्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जात असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं होतं.

हेही वाचा- १५ ऑगस्टपासून मॉल, हॉटेलसोबतच 'या' गोष्टींवरील निर्बंध होणार शिथिल, पण...

मात्र, जुलैच्या तुलनेत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लसीकरणात ३० टक्के घट दिसून आली आहे. लसीच्या तुटवड्यामुळं लसीकरणात अडथळे निर्माण होत आहेत. जुलैच्या पहिल्या आणि शेवटच्या दहा दिवसांत महाराष्ट्राला लसीचे ४० लाख डोस मिळाले होते. त्या तुलनेत आॅगस्ट महिन्यात आतापर्यंत २८ लाख डोसपेक्षा कमी डोस महाराष्ट्राला मिळाले आहेत.  

लसीच्या तुडवड्यामुळे महाराष्ट्रातील लसीकरण मोहिमेला अडथला येत आहे. परिणामी अनेक ठिकाणची लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. नागरिकांना तासंतास रांगेत तिष्ठत उभं राहून देखील लस मिळेनाशी झाली आहे. 

तर, दुसरीकडे आकड्यांच्याच बाबतीत बोलायचं झाल्यास, कोरोना लसीकरणात उत्तर प्रदेशने आघाडी घेतली असली तरी लशीच्या दोन्ही मात्रा देण्यात महाराष्ट्र देशात सर्वप्रथम आहे. उत्तर प्रदेशने आतापर्यंत ५ कोटी ५० लाख ४८ हजार इतके लसीकरण केलं आहे. तर तिथं दोन्ही मात्रा देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या ८६ लाख १८ हजार इतकी आहे. 

महाराष्ट्र लसीकरणात दुसऱ्या क्रमांकावर असून आतापर्यंत ४ कोटी ७५ लाख इतकं लसीकरण झालं आहे. मात्र दोन्ही मात्रा देण्यात महाराष्ट्र सर्वप्रथम असून १ कोटी २२ लाख नागरिकांना दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा- नवीन ऑक्सिजन प्लांट १७ ऑगस्टपासून होणार कार्यान्वित
पुढील बातमी
इतर बातम्या