मतदारयाद्या आणि मतदानयंत्रांवरून (EVM) विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगाला लक्ष्य करण्यात येत असताना निवडणूक यंत्रणांनी मुंबई महापालिका (brihanmumbai municipal corporation) निवडणुकीच्या वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत.
मुंबई (mumbai) महानगरपालिका निवडणुकांसाठी यंत्रणांची तयारी सुरू झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी हैदराबाद येथील भेल कंपनीच्या ‘ईव्हीएम’ वापरण्यात येणार आहेत.
या ‘ईव्हीएम’ मुंबईतील गोदामांमध्ये ठेवण्यात येणार आहेत. तिथे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेतील सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 19 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत टप्याटप्याने ‘ईव्हीएम’ मुंबईत दाखल होणार आहेत.
पहिल्याच दिवशी मुंबईत पाच वाहनांमधून 8,400 ईव्हीएम दाखल होणार आहे. दुसऱ्या दिवशी 8,100 ‘ईव्हीएम’ आणण्यात येतील. या ‘ईव्हीएम’सोबत 20 हजार ‘बॅलट युनिट’ आणि 25 हजार ‘कंट्रोल युनिट’ असतील.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 नोव्हेंबर रोजी 4,800 ‘ईव्हीएम’, 21 नोव्हेंबर रोजी 3 हजार ‘ईव्हीएम’ मुंबईसाठी रवाना होतील. 22 नोव्हेंबरला 5100, 24 नोव्हेंबरला 4800, 25 नोव्हेंबरला 3,000 आणि २६ नोव्हेंबरला 6,000 ‘ईव्हीएम’ मुंबईकडे रवाना होतील.
मुंबईत दाखल होणाऱ्या 'ईव्हीएम' विक्रोळी (vikhroli) आणि कांदिवली येथील गोदामात ठेवण्यात येणार आहेत. विक्रोळी येथे पार्क साईट आणि कांदिवली येथे संस्कृती काम्प्लेक्स येथील गोदामांमध्ये हा साठा ठेवण्यात येईल.
या दोन्ही गोदामांजवळ प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे दोन्ही गोदामांच्या ठिकाणी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विक्रोळी येथील गोदामाची जबाबदारी उमाकांत वैष्णव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर कांदिवली येथील गोदामाची जबाबदारी रमेश लष्करे यांच्याकडे देण्यात आली आहे.
हेही वाचा