मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास जुहू समुद्रकिनाऱ्यावर नियमित साफसफाईचे काम सुरू असताना हा अपघात झाला.
मृत महिलेची ओळख अनगम्मा देवेंद्रा (Angamma Devendra) अशी असून त्या एका खासगी संस्थेमार्फत सफाई कामगार म्हणून कार्यरत होत्या.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला बॉबकॅट यंत्राच्या बकेटमध्ये बसल्या होत्या. यंत्रचालकाने त्यांना तसे करू नये असा इशारा दिला होता, असा दावा करण्यात आला आहे.
मात्र, साफसफाईचे काम सुरू असतानाच यंत्र एका खड्ड्यातून गेल्याने त्यांचा तोल गेला आणि त्या बकेटमधून खाली पडल्या. त्यानंतर बॉबकॅट यंत्र त्यांच्या अंगावरून गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
अपघातानंतर त्यांना तातडीने कुपर रुग्णालयात (Cooper Hospital) दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अपघाताची नेमकी कारणे आणि सुरक्षाविषयक नियमांचे पालन झाले होते का, याची चौकशी केली जात आहे.
या घटनेनंतर महापालिका आणि कंत्राटी संस्थांकडून राबविण्यात येणाऱ्या साफसफाई मोहिमांमधील कामगारांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. समुद्रकिनाऱ्यावरील यंत्रसामग्रीच्या वापरादरम्यान सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
हेही वाचा