मुंबई-गोवा क्रूझवरील २००० पैकी ६६ प्रवासी पॉझिटिव्ह

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

परदेशातून गोव्यात आलेले ६६ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं गोव्यातील प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. या प्रवाशांना क्रूजमधून उतरण्याची परवानगी द्यायची की नाही? याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल अशी माहिती गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. विश्वजीत राणे यांनी ट्विट करत याबाबत कळवले आहे.

कॉर्डेलिया जहाजातील २००० नमुन्यांपैकी ६६ प्रवाशांची चाचणी कोविड पॉझिटिव्ह आढळली आहे. इथल्या कलेक्टर आणि एमपीटी कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली आहे.

जहाजातून प्रवाशांना खाली उतरवण्याची परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय अधिकारी घेतील, असं ट्विट गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी केलं आहे.

मुंबई-गोवा कॉर्डेलिया क्रूझवर (Mumbai-Goa Cordelia cruise) एका क्रू मेंबरला कोरोनाची लागण झाल्यानंतर किमान २००० प्रवाशांना आडकाठी करण्यात आली आहे. सर्व प्रवाशांना त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल येईपर्यंत क्रूझवरच राहण्यास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ही शिप मुंबईहून निघाली होती, तर गोव्यातील मुरगाव (Mormugao) क्रूझ टर्मिनलवर उतरली होती.

नववर्षाच्या स्वागताला देशविदेशातून पर्यटक गोव्यात दाखल होत असतात. त्यामुळे आता गोव्यात रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून हैराण करून सोडलेल्या कोरोनाचे रुग्ण मागील काही महिन्यात घटल्यानं काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढल्यानं चिंता वाढली आहे.

रविवारी मुंबईतही ८ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आल्यानं मुंबई महानगरपालिका प्रशासन कठोर पावलं उचलत आहे. रविवारी महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांनी अकरा हजारांचा आकडा पार केला आहे, त्यामुळे राज्यातले निर्बंधही आणखी कडक होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा

मुंबईतल्या पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद

चिंताजनक! मुंबईत परदेशवारी नसलेलेही ऑमिक्रॉनबाधित

पुढील बातमी
इतर बातम्या