मुंबई पश्चिम उपनगरातील गोरेगावमधील एका शाळेत घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात यश आलं आहे. शाळेमध्ये बिबट्या शिरल्यामुळे खबरदारी म्हणून आज सकाळी मुंबई पब्लिक स्कूल बंद ठेवण्यात आली आहे.
वनविभागाची टीम रात्रभर त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होती. अखेर आज सकाळी सहाच्या सुमारास त्याची सुरक्षित सुटका करण्यात आली.
रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास बिबट्या शाळेत घुसला. त्याचवेळी शाळेच्या सुरक्षारक्षकाची नजर त्याच्यावर पडली आणि त्याने तातडीने याची माहिती वन विभागाला दिली. यानंतर बोरिवली नॅशनल पार्कमधून वन विभागची टीम दाखल झाली. हा बिबट्या शाळेच्या बाथरुममध्ये जाऊन अडकला होता. तब्बल चार ते पाच तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला सुखरुप बाहेर काढण्यात आलं.
गोरेगाव बिंबिसार परिसर हा आरे कॉलनीच्या जंगलाला लागून असल्यामुळे इथे कायमच बिबट्याचा वावर असतो. त्यामुळे या परिसरातील लोक कायमच बिबट्याच्या दहशतीखाली असतात. आता बिबट्या थेट शाळेत घुसल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
तर वन अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, "या बिबट्याची याआधीही सुटका करण्यात आली होती. चांगली गोष्ट म्हणजे या बिबट्याने कधीच कोणावर हल्ला केला नाही. तरीही नागरिकांनी सतर्क रहावे "
गोरेगावमधील रहिवासी सोसायट्यांमध्ये यापूर्वीही बिबट्याचा वावर पाहायला मिळाला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या या परिसरात बिबट्या वारंवार येत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
हेही वाचा