भांडुप (bhandup) संकुलात आणखी एक 900 दशलक्ष लिटर क्षमतेचा पंप बसवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईला आणखी ‘फोर्स’मध्ये पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
भांडुप संकुलातून जलवाहिनीद्वारे मुंबईला पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या तेथे 220 दशलक्ष लिटर क्षमतेचा पंप आहे.
मुंबईला (mumbai) आणखी फोर्समध्ये पाणीपुरवठा करता यावा यासाठी 900 दशलक्ष लिटर पाणी वाहून नेणारा पंप बसवण्यात येणार आहे.
भांडुप कॉम्प्लेक्स (bhandup complex) येथील 900 एमएलडी (मिलियन लिटर प्रतिदिन) उदंचन केंद्रात 3437.5 घन मीटर प्रति तास क्षमतेचा सेंट्रीफ्यूगल पंप सेट बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हा सेंट्रीफ्यूगल पंप मोठ्या प्रमाणात पाणी जलद गतीने उचलून पुढे पाठविण्यास सक्षम असल्याने पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा होणार आहे.
भांडुप येथील उदंचन केंद्र हे मुंबईच्या पाणीपुरवठा (water supply) व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे.
येथे बसविण्यात येणारा नवीन पंप कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील विविध भागांमध्ये पाण्याचा दाब (प्रेशर) सुधारेल आणि पाणीपुरवठ्यातील अडथळे कमी होतील, असे पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
तसेच जुन्या यंत्रणांवरील ताण कमी होऊन देखभाल खर्चातही बचत होण्याची शक्यता आहे. विशेषतः उष्णतेच्या काळात किंवा पाण्याची मागणी वाढल्यास या पंपामुळे पुरवठा सुरळीत ठेवणे सोपे होणार आहे.
महापालिकेचा हा उपक्रम पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांना अधिक ‘फोर्स’मध्ये पाणी उपलब्ध होणार आहे.
मुंबईला दररोज सुमारे 3,950 ते 4,000 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. तो प्रामुख्याने भातसा, मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा यांसारख्या सात प्रमुख धरणांमधून येतो. हे पाणी भांडुप आणि पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून मुंबईला (शहर आणि उपनगरे) पुरवले जाते.
हेही वाचा