मुंबईतील लसीकरणाला गती देणं आवश्यक, आदित्य ठाकरेंची महापालिकेला सूचना

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई (mumbai) शहरातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण (corona vaccination)  गतिमान करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सोमवारी मुंबई महापालिकेशी आढावा बैठक घेऊन चर्चा केली. लसींची उपलब्धता तसंच शहरातील लसीकरण गतिमान करण्याच्या अनुषंगाने काय काय उपाययोजना करता येतील यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. महापालिका मुख्यालयात ही बैठक झाली

या बैठकीस महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि सुरेश काकाणी उपस्थित होते.

पालकमंत्री ठाकरे म्हणाले की, जास्तीत जास्त लोकसंख्या लसीकरणाखाली आणल्यानंतर कोरोनाची साथ लवकरात लवकर आटोक्यात आणण्यात यश येऊ शकेल. त्यामुळे लसींची उपलब्धता आणि लसीकरणाला गती देणे आवश्यक आहे. यादृष्टीने व्यापक असा आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबतही यावेळी चर्चा झाली. या विद्यार्थ्यांना कोविशिल्ड लस आवश्यक असून या लसीसाठी दोन डोसमधील अंतर जास्त आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना लसीचा पहिला डोस मिळूनही दुसऱ्या डोससाठी किमान ८४ दिवस थांबावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. या कालावधीत अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी दोन डोसमधील गॅप कमी करता येऊ शकेल का याबाबत यावेळी चर्चा झाली. यासंदर्भात केंद्र शासनाशी संपर्क साधून चर्चा करण्यात येत आहे, असे मनपा अधिकाऱ्यांनी यावेळी  सांगितले. या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही यापद्धतीने त्यांच्या लसीकरणास चालना देण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या.



हेही वाचा -

राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढला; पाहा काय बंद काय सुरू?

  1. मुंबईतील रस्त्यांवर होणाऱ्या गर्दीवर मुख्यमंत्र्यांची नाराजी, निर्बंध कडक करण्याचा इशारा
पुढील बातमी
इतर बातम्या