ट्रेनमध्ये खराब फळांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मडगाव जंक्शन ते सीएसएमटी (csmt) जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये खराब फळे विकणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांवर कोकण रेल्वेने तातडीने कारवाई केली आहे.

तसेच प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने 15 दिवसांची विशेष मोहीम हाती घेतली आहे.

जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये (janshatabdi express) नियमित तपासणीदरम्यान एक व्यक्ती रेल्वेगाडीत खराब फळे विकताना आढळून आली. प्राथमिक चौकशीत त्या व्यक्तीकडे कोणतेही वैध ओळखपत्र किंवा विक्री परवाना नसल्याचे समोर आले.

त्यामुळे रेल्वे प्रशासनाने संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीला पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय कार्यवाहीसाठी रत्नागिरी येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या (RPF) ताब्यात देण्यात आले.

प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण सेवा पुरवणे ही रेल्वेची सर्वोच्च जबाबदारी असल्याचे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, रेल्वेगाड्यांमधील अनधिकृत विक्री, अतिरिक्त दर आकारणी, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कोकण रेल्वेने मोठ्या प्रमाणावर विशेष मोहीम सुरू केली आहे.

31 मेपासून सुरू झालेली ही मोहीम कोकण रेल्वेच्या वाणिज्य विभाग आणि रेल्वे संरक्षण दलाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत संपूर्ण कोकण रेल्वे (konkan railway) मार्गावरील प्रमुख स्थानके, फलाट, रेल्वेगाड्या; तसेच खानपान सेवा देणाऱ्या घटकांची सखोल तपासणी केली जात आहे.

अनधिकृत विक्रेते, दलाल, अवैध फेरीवाले आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत असून, प्रवाशांच्या हिताला प्राधान्य देत रेल्वे प्रशासन सतर्कपणे काम करत आहे.


हेही वाचा

मुंबईत कबुतरांना दाणा टाकण्याविरोधातील BMC मोहीम मंदावली

ठाणे महापालिकेची पहिली CBSE शाळा 8 जूनपासून सुरू

पुढील बातमी
इतर बातम्या